
देवगड : देवगड तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्याने आंबा बागायतदारांच्या दृष्टीने सुखावह बाब मानली जात आहे. यंदाचा आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात आल्याने कॅनिंगच्या माध्यमातून प्रक्रीया उद्योगासाठी आंबा जात आहे.अजूनतरी कैनिंग आंब्याला चांगला भाव मिळत आहे.त्यामुळे आंबा बागायतदारांची अखेरच्या टप्यातील आंबा काढणीची धावपळ सुरू आहे.
हापूस हंगामात प्रक्रीया उद्योगासाठी सिंधुदुर्गात कैनिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. कॅनिंगसाठी बागायतदारांच्या बागेत फिरून आंबा गोळा केला जातो. तर काहीवेळा बागायतदार स्वतः व्यावसायिकांकडे आपला आंबा घेऊन येतात. यंदा हापूसची मोठी उलाढाल झाली. तुलनेत फळबाजारातील दर कमी-अधिक राहिले. मात्र, खासगी बाजारात दर चांगला मिळाला.काही बागायतदारांकडील आंबा आता अखेरच्या टप्यात आला आहे. त्यातच कॅनिंग व्यवसाय सुरू झाला आहे. मुबलक आंबा झाला आणि फळबाजारातील दर घसरले की आपोआपच प्रक्रीया उद्योगाकडे आंबा वळतो असे सर्वसाधारण चित्र असते.
आता फळबाजारात आंबा जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतवारी करून उरलेला तसेच डागी आंबा कॅनिंगला दिला जातो. कॅनिंग व्यवसायामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होण्यासही मदत होते. आता आंबा हंगाम अखेरच्या टप्यात आल्याने कॅनिंग व्यवसायात तेजी आहे. सध्या सुमारे ४० ते ४५ रूपये किलोप्रमाणे दर दिला जात आहे. त्यामुळे मोठे बागायतदार प्रतवारी करून शिल्लक राहिलेला आंबा कॅनिंगसाठी देत आहेत. अखेरच्या टप्यात हंगाम आल्याने आता आंबा काढणी मंदावली आहे. अजून काही बागांमध्ये झाडांवर आंबा आहे. मात्र, आंबा तयार होण्यासाठी काही कालावधी जाईल, असे चित्र आहे.