'दिगंबरा... 'च्या जयघोषाने दुमदुमली माणगावनगरी !

हजारो भाविकांनी घेतले जन्मोत्सवाचे दर्शन
Edited by: भरत केसरकर
Published on: December 07, 2022 20:11 PM
views 215  views

कुडाळ : 'दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा!' नामजप करत शेकडो भाविक भक्तांनी माणगाव येथील दत्तमंदिरात हजेरी लावत दत्तप्रभुंचे दर्शन घेतले. सिंधुदुर्गसह पुणे, मुंबई, गोवा, गुजरात राज्यासह देशभरातील विविध ठिकाणाहून आलेल्या असंख्य भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. त्यामुळे माणगाव दत्त मंदिर परिसरात भक्तांची मांदियाळीच दिसून आली.

कुडाळ तालुक्यातील माणगाव दत्तमंदिरात १ डिसेंबर पासून दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी दत्तजयंतीनिमित्त मंदिर परिसर रोषणाई व फुलांनी सजविण्यात आले होते. आलेल्या भक्तांना दर्शन व्हावे, यासाठी ट्रस्टच्या वतीने नीटनेटके नियोजन केले होते. दरम्यान, सकाळी नामस्मरण, अभिषेक, महापूजा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक भक्तांनी  घेतला.


दत्तजयंतीनिमित्त बुधवारी सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. परजिल्ह्यासह गुजरात व गोवा राज्यातील भक्तांनी तर दोन दिवस आधीच या उत्सवासाठी हजेरी लावली होती. मुख्य रस्त्यापासून दत्तमंदिरापर्यंत येणारा  रस्ता अरूंद असल्याने वाहनांची मोठी गर्दी होणार होती. यासाठी मंदिरापासून ५०० मीटर अंतरावरच गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती.

सायंकाळी ६ वाजता दत्तप्रभूंचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी असंख्य दत्त भक्तांनी उपस्थिती दर्शवत 'श्रीं'च्या जन्मोत्सवाचे दर्शन घेतले. दत्तप्रभूंचा जन्मसोहळा 'याची देही याची डोळा' पाहण्याचा योग उपस्थित हजारो भक्तांनी घेतला. यावेळी 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा!' हा नामजप उपस्थित प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून येत होता. जन्मसोहळ्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. 



सायंकाळी आरती व रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त ताम्हाणेकर पेट्रोल पंप व जे. के. सिमेंट सिंधुदुर्गच्या वतीने दत्त भक्तांना मोफत साबुदाणा वडा व मसाला दुधाचे वाटप करण्यात आले.  यावेळी पोलीस व होमगार्ड यांनीही चांगल्या प्रकारे ट्राफिकचे नियोजन केल्याने दत्त भक्तांना कोणतीही अडचण झाली नाही.