
कुडाळ : कुडाळ शहरातील अनेक ठिकाणी असलेले गंजलेले आणि धोकादायक लोखंडी विद्युत पोल अखेरीस बदलण्यात आले असून, कमी उंचीवर आलेल्या इलेक्ट्रिक वायर देखील सुरक्षित उंचीवर नेण्यात आल्या आहेत. या कामामुळे परिसरातील संभाव्य दुर्घटना टळली असून, हा महत्त्वपूर्ण बदल नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या विशेष प्रयत्नातून शक्य झाला आहे.
अभिनव नगर आणि विठ्ठलवाडी येथील नागरिकांनी परिसरातील गंजलेल्या पोल आणि धोकादायक पद्धतीने खाली आलेल्या इलेक्ट्रिक वायरमुळे निर्माण झालेल्या धोक्याबद्दल नगरसेवक मंदार शिरसाट यांच्याकडे तक्रार केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत, नगरसेवक शिरसाट यांनी महावितरण (MSEB) प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, महावितरणच्या माध्यमातून हे सर्व धोकादायक पोल बदलण्यात आले. जुन्या, गंजलेल्या लोखंडी पोलच्या जागी नवीन, सुरक्षित पोल उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर, रस्त्यावरून किंवा घरांजवळून धोकादायकपणे खाली आलेल्या सर्व विद्युत वाहिन्या (वायर) देखील आता योग्य आणि सुरक्षित उंचीवर नेण्यात आल्या आहेत.
यानिमित्ताने नगरसेवक मंदार शिरसाट यांनी कुडाळ शहरातील अन्य नागरिकांनाही आवाहन केले आहे. शहराच्या कोणत्याही भागात असे गंजलेले, धोकादायक झालेले विद्युत पोल आढळल्यास किंवा इलेक्ट्रिक वायर असुरक्षितपणे खाली आल्यास, नागरिकांनी तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधावा. नागरिकांची सुरक्षा जपण्यासाठी ते महावितरणच्या मदतीने तातडीने योग्य ती कार्यवाही करतील.










