कामथेच्या मानसी तटकरेची महाराष्ट्र कारागृह विभागात नियुक्ती

Edited by: मनोज पवार
Published on: July 01, 2025 15:41 PM
views 138  views

चिपळूण : मा. बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कामथेच्या माजी विद्यार्थिनी कु. मानसी दीपक तटकरे हिची महाराष्ट्र कारागृह विभाग, पुणे येथे पोलीस खात्यात नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने प्रमुखाध्यापिका सौ. डिंगणकर मॅडम आणि सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते मानसीचा यथोचित गौरव करण्यात आला.


या वेळी श्री. भूषण कांबळी यांनी मनोगत व्यक्त करत मानसीला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुखाध्यापिका सौ. डिंगणकर व श्री. नटे सर यांनीही तिला पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमादरम्यान श्री. संदीप थोरवडे यांनी मानसीची मुलाखत घेतली. या संवादादरम्यान मानसीने विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हटले की, "यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांचा सन्मान, गुरूजनांचा आदर, तसेच जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे." तिच्या विचारांनी विद्यार्थ्यांना मोठा प्रेरणास्रोत लाभला.


या कार्यक्रमाचे नियोजन श्री. नटे सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री. प्रदीप ठसाळे, तर आभारप्रदर्शनही त्यांच्याच हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमात शिक्षकवृंद, मान्यवर, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानसीने मिळवलेल्या या यशामुळे कामथे गावासह विद्यालयाचे नाव उज्वल झाले आहे.