डोळ्यासमोर नाहीसे होणार कर्ली खाडीपात्र

अवैध वाळू उत्खनन
Edited by:
Published on: June 18, 2024 14:32 PM
views 358  views

मालवण : कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरु असून यावर कारवाई करावी अशी मागणी तेथील काही ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यास ग्रामस्थ खाडी पात्रामध्ये उतरून अनधिकृत वाळू उत्खनन विरोधात आंदोलन करतील असाही इशारा देण्यात आला आहे.

देवली वाघवणे कर्ली नदी पात्रातील डी पाच या वाळू पट्ट्यामध्ये शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव जाहीर झालेले नाही तरीही या वाळू पट्ट्यामध्ये बेसुमार वाळू चोरी होत आहे. नदी पात्रा लगत १८०० मिटरचा खार बंधारा आहे. या खार बांधऱ्याच्या आत शेती, माड बागायती तसेच ग्रामस्थांची घरे आहेत. वाळू उत्खननामुळे खार बंधारा खचून गेल्याची स्थिती आहे तसेच लोकवस्तीसह शेती माड बागायतीही धोक्यात आली आहे. दिवसाही सुरु असलेले येथील अवैद्य वाळू उत्खनन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेस येत नाही का असाही संतप्त सवाल करण्यात आला आहे. दरम्यान अनधिकृत वाळू उत्खननावर प्रशासनाने ठोस कारवाई करून ते बंद करावे अन्यथा ग्रामस्थ खाडी पात्रामध्ये उतरून अनधिकृत वाळू उत्खनन विरोधात आंदोलन करतील यात प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनावर विरेश मांजरेकर, महेश चव्हाण, प्रकाश मांजरेकर, रावजी मांजरेकर, हेमंत चव्हाण, शोभा आचरेकर, विजय आचरेकर, बापूजी चव्हाण, जगन्नाथ मांजरेकर, वैशाली चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.