
मालवण : सावरवाड तिठा ते वराड रस्त्याच्या निकृष्ट व रखडलेल्या कामामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत साखळी क्र. ०/००० ते ४/७८५ या रस्त्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून धिम्या गतीने सुरू आहे. ठेकेदाराची मुदत संपूनही काम अपूर्णच राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.
वारंवार तक्रारी, आंदोलने आणि उपोषण करूनही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदार ढिम्मच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे. पावसाळा तोंडावर असताना रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होणार आहे. पावसाळ्यानंतर या मार्गावर वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेही धोकादायक ठरणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. संभाव्य अपघातांसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कुडाळ येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयासमोर ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण करूनही कामात कोणतीही गती आलेली नाही. त्यामुळे आता संयमाचा बांध फुटला असून, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.










