
मालवण : राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा फटका लहान मुलांना बसत आहे. मालवण शहरातही सध्या कडक ऊन पडत असून या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा गटनेत्या अन्वेषा आचरेकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत शहरात एकूण आठ ठिकाणी अंगणवाड्या कार्यरत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये प्रामुख्याने ३ ते ६ वयोगटातील लहान मुले शिक्षणासाठी येतात. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असतानाही अंगणवाड्यांची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. भर दुपारी सुट्टी होत असल्याने लहान मुलांना या कडाक्याच्या उन्हातून घरी जावे लागते, ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
सौ. आचरेकर यांनी निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी साधारणतः १ एप्रिलपासून अंगणवाड्यांची वेळ बदलून ती सकाळी ८.३० ते ११.३० अशी केली जाते. मात्र, यंदा एप्रिल महिना सुरू होऊनही अद्याप वेळेत बदल का करण्यात आला नाही? याबाबत प्रशासनाकडे कोणतेही ठोस उत्तर नाही.
उच्च तापमान असतानाही लहान मुलांना दुपारी २ वाजेपर्यंत अंगणवाडीत थांबावे लागणे हे त्रासदायक आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुलांच्या हितासाठी वेळेत बदल करावा अशी मागणी अन्वेषा आचरेकर यांनी केली आहे.
वाढत्या तापमानामुळे लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंगणवाड्यांची वेळ सकाळच्या सत्रात करावी, जेणेकरून मुले ऊन वाढण्यापूर्वी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकतील. आता गटविकास अधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे मालवणवासीयांचे लक्ष लागले आहे.










