
कणकवली : कणकवली नगरपंचायत प्रशासनाने शहर विकासासाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप आराखड्यात टाकण्यात आलेले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण रद्द करण्यात यावे, अन्यथा सोमवार २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर सामुदायिक आमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा शहरातील जमीन मालकांनी नगर रचनाकार विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, जमीन मालकांनी सोमवारी नगराध्यक्ष दालनात नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आरक्षण रद्द करण्यासह चुकीच्या विकास आराखडा दुरुस्ती करण्यात यावी. आरखडयावर हरकती नोंदविण्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशा मागण्या केल्या. यावर आराखडयाचा अभ्यास करून शासनाकडे दुरुस्त्यांची मागणी करण्यात येईल, असे आश्वासन पारकर यांनी दिले.
यावेळी सखाराम राणे, दत्ताराम राणे, गंगाराम राणे, संतोष राणे , सदाशिव राणे, दीपक राणे ,सुनील राणे ,दीपक राणे , सुदेश राणे, संजय राणे, विठ्ठल साटम, रोहित मर्गज, मानसी राणे, विलास हुन्नरे, अविनाश राणे, वसंत राणे, योगेश हेरेकर, मानसी मुसळे, उदय राणे, लक्ष्मण पिळणकर, रवींद्र पिळणकर, मधुकर कदम आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, नगर रचनाकार, असिस्टंट डायरेक्टर टाऊन प्लानिंग तसेच नियोजन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांना देण्यात आलेल्या निवेदनात सर्वे क्रमांक ११५, ११०, १११, १०४, ११३ या जमिनी आमच्या मालकी व वहिवाटीच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नव्याने जाहीर झालेल्या शहर विकास प्रारूप आराखड्यात या जमिनींवर आरक्षण क्र. ४२ अंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे आरक्षण दाखविण्यात आले असून ते अन्यायकारक असल्याचा आरोप जमिनी मालकांनी केला आहे. यापूर्वी या जागेवर २५ वर्षांसाठी स्टेडियमचे आरक्षण होते, त्यापूर्वी १९९९ पूर्वी एमआयडीसीसाठी आरक्षित होती. अनेक वर्षे लढा देऊन स्टेडियमचे आरक्षण हटविण्यात आले होते. मात्र पुन्हा नव्याने स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी आरक्षण दाखविण्यात आल्याने आमच्या मालकीच्या जमिनींचा विकास करणे अशक्य होत असल्याने आमच्यावर अन्याय होत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. सदर आरक्षण क्र. ४२ रद्द करून तसेच सध्या ग्रीन झोनमध्ये दाखविण्यात आलेली जागा येलो झोनमध्ये समाविष्ट करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा बेमुदत संप सुरू असून कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नसल्यामुळे हरकती नोंदविण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्या रविवार दि. २२ मार्चपर्यंत मान्य न झाल्यास सोमवार दि. २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता नगरपंचायत कार्यालयासमोर सामुदायिक आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, जमिनी मालकांनी नगराध्यक्ष संदेश पारकर व न. पं. चे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.










