
मालवण : कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि रिषु किचू इंडस्ट्रीज, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथील शिवशक्ती हॉलमध्ये महावितरण बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांसाठी विशेष माहिती व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या योजनांची माहिती देऊन विमा कार्डांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि शाखा प्रबंधक सुरेंद्र नाईक यांनी कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे विश्लेषण केले. तसेच राहुल मांडवकर यांनी या योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यावा, अर्जाची प्रक्रिया काय असते, यावर विस्तृत मार्गदर्शन केले.
कंत्राटदार अरिफ तांबोळी यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षेबाबत तांत्रिक प्रशिक्षण दिले. जोखमीचे काम करताना स्वतःच्या जिवाची आणि कुटुंबाची काळजी घेणे ही आपली पहिली जबाबदारी आहे, असे आवाहन करत त्यांनी कर्मचाऱ्यांकडून सुरक्षेची प्रतिज्ञा घेतली. मार्गदर्शक अशोक सावंत यांनी सर्व कर्मचाऱ्यांना एकसंघ राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे आणि विमा कार्डांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कर्मचारी संघटनेचे झोन अध्यक्ष आनंद लाड, जिल्हाध्यक्ष संदीप बांदेकर, संजय गोवेकर, महेश राउळ, दिनेश तांबे आणि राजू दळवी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापक समाधान चव्हाण यांनी केले. आनंद लाड यांनी आभार मानले.










