
कणकवली : वेंगुर्ला नगर वाचनालय यांचा डॉक्टर प्रा शरयू आसोलकर पुरस्कृत कै़ कृष्णा आसोलकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा पहिला बाल साहित्य सेवा पुरस्कार महेश काणेकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कारांचा वितरण सोहळा 18 जानेवारी रोजी वेंगुर्ला नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. महेश काणेकर गेली 35 वर्षे सातत्याने बाल साहित्य लिहित असून सन 1989 मध्ये त्यांच्या पहिल्या प्रसिद्ध झालेल्या 'करामत बालमृतिकाराची' या बालकथा संग्रहाला पद्मश्री मधूमंगेश कर्णिक यांची प्रस्तावना लाभली असून त्यानंतर त्यांचे अमर वृक्ष माझा मित्र, एक रविवार हौसेचा, धाडसी मयूर, आळशी जगु इत्यादी संस्कारक्षम बालकथा संग्रह आणि चिमण्यांची शाळा हा बालकविता संग्रह प्रकाशित आहे शिवाय निर्मोही हा कथासंग्रह तसेच एका रम्य गावात हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे.
अक्षर सिंधू साहित्य कला मंच या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष असून कला तपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी बाल साहित्य चळवळीसाठी विशेष योगदान दिलेले आहे. ट्रस्टच्या माध्यमातून ते दरवर्षी बाल साहित्यिकांना विशेष पुरस्कार देतात. स्वरांजली या ग्रुपची स्थापना करून त्यामार्फत भावगीत गाण्यांचा कार्यक्रमही ते सादर करतात. त्यांनी नगर वाचनालय कणकवलीच्या कार्यवाह पदाची दहा वर्ष यशस्वी धुरा सांभाळलेली आहे. त्यांचे जिल्ह्यातील साहित्य सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रातील कार्य भरीव असून ते लायन्स क्लब कणकवलीचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. या पुरस्काराबद्दल काणेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.










