
कणकवली : कणकवली महाविद्यालयात अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. तळ कोकणात कणकवली येथे होणारे अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन असून अधिवेशनासाठी देश-विदेशातून ३२६ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजक तथा कणकवली महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे यांनी दिली आहे. अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध विचारवंत डॉ. अशोक राणा (यवतमाळ) मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रा .डॉ. राजश्री साळुंखे असणार आहेत. अधिवेशनात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जी. डी. खानदेशे आणि विचारवंत डॉ. अशोक राणा यांना अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अधिवेशनानिमित्त शिवकालीन क्रीडा प्रदर्शन, मोडी लिपी प्रदर्शन, ऐतिहासिक दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन व नाणे प्रदर्शन अशा विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात दोन दिवसांत एकूण १४ सत्रांमध्ये प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारत तसेच आंतरविद्याशाखीय शोधनिबंधांचे सादरीकरण होणार आहे. या सत्रांचे अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणून दुबई येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ दीपक पाटील, तसेच डॉ.संजय पाटील, अहिल्यानगर येथील इतिहास संशोधक डॉ. किरण जाधव, कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर तसेच मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. लक्ष्मी साळवी उपस्थित राहणार आहेत.
समारोप समारंभासाठी मुंबई विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नारायण भोसले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे मा.विजयकुमार वळंजू उपस्थित राहणार आहेत. यावेळी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुणा मोरे, सचिव डॉ. सोपान जावळे, डॉ. सतीश कदम, डॉ. सोमनाथ रोडे, प्राचार्य राजेंद्र कांबळे, डॉ. गीतांजली बोराडे, डॉ. नारायण कांबळे, डॉ. प्रदीप वाघमारे व तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
अधिवेशनानिमित्त कोकणातील कला, शिल्पकला, वास्तुकला व कातळशिल्प कला यांना राष्ट्रीय पातळीवर अभ्यासकांचे लक्ष वेधण्यासाठी एक स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात कातळशिल्पाचे ज्येष्ठ अभ्यासक सतीश लळीत व ए. के. मराठे हे कोकणातील कातळशिल्पांवर विशेष सादरीकरण करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासन पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ' कनक' ही स्मरणिका तसेच शोधनिबंधांच्या पाच स्वतंत्र शोधनिबंध संग्रहाचे यावेळी प्रकाशन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इतिहासप्रेमी अभ्यासक, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी या राष्ट्रीय अधिवेशनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, अधिवेशन समन्वयक व स्थानिक सचिव तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंबरकर, तसेच डॉ. एस. टी. दिसले, डॉ. बी. एल. राठोड, डॉ. मारोती चव्हाण, प्रा.निलेश खुटाळे यांनी केले आहे.










