
मालवण : मालवण नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उद्या १ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली. या प्रचार रॅलीला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार आणि पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. भाजपच्या उमेदवारांसाठी ही रॅली निर्णायक ठरणार आहे.
सकाळी १० वाजता भरड नाका येथून रॅलीला सुरूवात होणार आहे. रॅलीच्या माध्यमातून मंत्री आशिष शेलार हे शहरातील बाजारपेठेतील प्रत्येक नागरिकाची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधणार आहेत. भरड नाका येथून सुरू होणारी ही रॅली बाजारपेठ मार्गे पुढे फोवकांडा पिंपळ येथे समाप्त होणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून भाजप नागरिकांपर्यंत पोहोचून आपले उमेदवार विजयी करण्यासाठी आवाहन करणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात भाजपची ही रॅली विशेष लक्षवेधी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.










