मालवण शहराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित : महेश कांदळगावकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 17, 2025 16:15 PM
views 115  views

मालवण : शिवसेना-भाजप युती आणि मालवणच्या जनतेच्या आशीर्वादामुळे २०१६ ते २०२१ या कालावधीत मला मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगरपालिकेतील कर्मचारी म्हणून काम केल्याच्या प्रशासकीय अनुभवाच्या बळावर मालवण शहराच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासोबतच पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपयांची विकासकामे प्रस्तावित करण्यात यश आले, अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांनी पत्रकातून दिली.

या पाच वर्षांच्या कार्यकाळात जवळपास दोन वर्षे कोरोनाचे संकट होते. त्यामुळे निधीची कमतरता आणि लॉकडाऊन यामुळे अनेक प्रस्तावित कामे पूर्ण होऊ शकली नाहीत याचे शल्य कायम राहणार आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात मालवण शहराचा विकास हाच ध्यास घेऊन कोणतेही राजकारण न करता काम करण्यावर भर दिला. युतीतील सहकारी नगरसेवक आणि काही अपवाद वगळता विरोधी पक्षातील नगरसेवकांनीही विकासकामांमध्ये सहकार्याची भूमिका घेतली. सभागृहात पूर्ण पाच वर्षांत फक्त दोन-तीन वेळा ठरावांवर मतदान झाले बाकी सर्व ठराव एकमताने घेण्यात आले. हे त्याचेच द्योतक असल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. 

निधीअभावी बंद असलेली भुयारी गटार योजनेच्या कामासाठी सुमारे १० कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त करून घेत ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोना आणि ठेकेदाराच्या अनास्थेमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही तसेच मागील चार वर्षांच्या प्रशासकीय काळातही ठोस पाठपुरावा झाला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शहरासाठी आवश्यक असलेली सुमारे ४० कोटी रुपयांची सुधारित नळपाणी योजना प्रस्तावित करून मंजूर करण्यात आली. आता या कामाला सुरुवात झाली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे सुमारे २ कोटी रुपयांची सुसज्ज अग्निशमन इमारत आणि ५५ लाख रुपयांची अग्निशमन गाडी घेण्यात आली. सुमारे १.५० कोटी रुपये खर्चून नगर परिषद इमारत आणि परिसर सुशोभीकरण करून आकर्षक रूप देण्यात आले. शहरातील नागरिकांसाठी एकाच ठिकाणी भाजी आणि फळे उपलब्ध व्हावी यासाठी सुमारे २ कोटी रुपये किमतीच्या भाजी मार्केट इमारतीचे काम सुरू करण्यात आले. सध्या प्रशासकीय त्रुटीमुळे ते बंद आहे. रॉक गार्डन, चिवला बीच आणि बंदर जेटी येथे सुमारे ३.५० कोटी रुपयांचे डेकोरेटिव्ह लाइट बसवून सुशोभीकरण करण्यात आले. कोकणातील पहिला सुमारे १.२५ कोटी रुपयांचा म्युझिकल फाऊंटन रॉक गार्डनमध्ये बसवण्यात आला. तसेच २५ लाख रुपयांची खेळणी बसविण्यात आली. सुमारे ७५ लाख रुपये किमतीचा ३०० लोकांच्या क्षमतेचा एसी मल्टिपर्पज हॉल बांधण्यात आला. यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. आडारी गणपती मंदिर आणि कोळंब पूल नजीक सुमारे ४० लाख रुपये खर्चून डेकोरेटिव्ह लाइट, पाथवे, रेलिंग बसवून शहराच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात आले. तसेच बंदर जेटीवरील मावळ्यांचे पुतळे, बाजारपेठ, उद्याने अशा महत्वाच्या ठिकाणी सुमारे ८६ लाख रुपयांचे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले.

ऊर्जा बचतीच्या उद्देशाने संपूर्ण शहरात १.२५ कोटी रुपयांचे एलइडी लाईट बसवण्यात आले, तसेच मुख्य चौक, किनारपट्टीवर सुमारे २ कोटी रुपयांचे ३२ हायमास्ट बसवण्यात आले. पर्यटकांच्या सुविधेसाठी संपूर्ण शहरात सुमारे २५ लाख रुपयांचे दिशादर्शक फलक बसविण्यात आले. पर्यटन वाढीसाठी रेवतळे येथे सुमारे २५ कोटी रुपयांचे अद्ययावत मत्स्यालय प्रस्तावित केले होते. यासाठी ११ कोटींचा निधीही मिळाला होता, मात्र जागेच्या वाटाघाटीमुळे ते काम सुरू करता आले नाही. जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या १५ कोटी रुपयांच्या निधीतून नवीन रस्ते, गटारे, डांबरीकरण इत्यादी विकासकामे करण्यात आली.

प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे चार वर्षांच्या प्रशासकीय काळातही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. या संदर्भात सविस्तर निवेदन आमदार निलेश राणे यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून लवकरच ही सर्व कामे सुरू होतील, असा विश्वास कांदळगावकर यांनी व्यक्त केला. आमदारांच्या व्हिजनमुळे येणाऱ्या पाच वर्षांत मालवणचा चेहरामोहरा बदलून जाईल. यात शंका नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. माझ्या कार्यकाळात कार्यकर्त्यांच्या जीवावर नगराध्यक्षपद भूषवता आले. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत मी नगरसेवकपदाची निवडणूक न लढवता कार्यकर्त्याला संधी देणार आहे. यावेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. महायुतीची निर्विवाद सत्ता येणार असून नवनिर्वाचित महिला नगराध्यक्षांना माझ्या २१ वर्षांच्या प्रशासकीय आणि ५ वर्षांच्या नगराध्यक्षपदाच्या अनुभवाच्या जोरावर मालवणच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका राहील, असे श्री. कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.