
मालवण : तरुणांनी आपल्या करिअर आणि आरोग्याला प्राधान्य देत कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे, असे प्रतिपादन कुडाळ येथील मानसशास्त्रज्ञ रूपा नाईक यांनी येथे केले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन येथे महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी 'अंमली पदार्थ आणि तरुणांवर होणारे दुष्परिणाम' या विषयावर एक विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
यावेळी कुडाळ येथील मानसशास्त्रज्ञ रूपा नाईक यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे तरुणांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर होणारे गंभीर दुष्परिणाम, व्यसनाधीनतेची कारणे तसेच या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असणारे मानसिक आणि सामाजिक आधार याबद्दल सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमास शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने आणि पोलीस हवालदार सुशांत पवार हे उपस्थित होते. पोलीस दलातर्फे तरुणांना अमली पदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमाचे तंत्रनिकेतन प्रशासनाने कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. या व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या धोक्यांविषयी मोठी जागरूकता निर्माण झाली.










