ज्येष्ठ मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांना राजधानी पुरस्कार

कोकणात आनंदाचा माहोल
Edited by:
Published on: September 26, 2025 20:46 PM
views 563  views

मालवण : मालवणी भाषेतील ज्येष्ठ कवी रुजारिओ पास्कल पिंटो यांना प्रतिष्ठेचा राजधानी पुरस्कार जाहीर होताच संपूर्ण मालवण परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांनी रत्नागिरीतील केशवसुतांचे जन्मस्थळ मालगुंड याला “आधुनिक कविंची राजधानी” असे संबोधले होते. याच पार्श्वभूमीवर या मानाच्या पुरस्काराला ‘राजधानी पुरस्कार’ हे नाव देण्यात आले आहे.

या पुरस्कारामध्ये दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ यांचा समावेश असून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यापूर्वी हा मान कवी अशोक नायगांवकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, डॉ. महेश केळुसकर, कवी सौमित्र, प्रा. निरजा यांसारख्या ख्यातनाम कवींना मिळाला आहे. मात्र अस्सल मालवणी बोलीतील कवीला हा पुरस्कार पहिल्यांदाच बहाल होतो आहे, ही संपूर्ण कोकणासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

रुजारिओ पिंटो हे मराठी, कोकणी, मालवणी आणि हिंदी या चार भाषांमध्ये काव्य साकारणारे एकमेव कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे माऊली, दर्यादेगेर (कोकणी), आम्ही मालवणी, गरो फणसाचो (मालवणी) हे लोकप्रिय कविता संग्रह तसेच ‘बूमरँग’ हा चर्चित कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठाच्या एस. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात तसेच गोवा राज्याच्या पाठ्यपुस्तकात झाला आहे. महाराष्ट्र व गोवा येथे त्यांच्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमांना सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असतो. राष्ट्रीय साहित्य अकादमी नवी दिल्लीच्या कोकणी समितीचे सदस्य, तसेच अखिल भारतीय कोकणी साहित्य परिषदेचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.

आम्ही मालवणी आणि माझा कोकण या त्यांच्या कवितासंग्रहांच्या सीडीज् मालवणी प्रांतात मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. गेल्या ३० वर्षांपासून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विविध पदांवर सक्रिय असलेल्या पिंटो यांच्या राजधानी पुरस्कार निवडीबद्दल संपूर्ण कोकणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.