
दोडामार्ग : दोडामार्ग मधील हत्ती प्रश्न अजून जटिल होत चालला आहे. हत्तींकडून नुकसानीचे सत्र सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वी मोर्ले येथील एकाचा बळीही हत्तीने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हत्ती पकड मोहिमेत उत्सुकता दाखवत दोडामार्ग तालुका हत्ती मुक्त करावा अन्यथा सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, शेतकरी व यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन वनविभाग व महाराष्ट्र सरकारच्या विरोधात छेडले जाईल असा इशारा स्वराज्य संस्था सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी पत्रकार परिषदे मार्फत दिला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मोर्ले येथे हत्तीने एका शेतकऱ्याचा निष्पाप बळी घेतल्यानंतर परिसरातील गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावेळी वनविभागाकडून ३० जून पर्यंत ओंकार नामक हत्तीला पकडण्यात यावे असा आदेश काढला होता. मात्र दिलेली डेडलाईन ही संपली आहे मात्र पकड मोहीम राबविण्यात आलेली नाही. आता डिसेंबर अखेर पर्यंत हत्ती पकड मोहीम राबविली जाईल असे सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात पकड मोहीम राबवावी हीच आमच्या शेतकऱ्यांची प्राधान्याने मागणी आहे असेही श्री. गवस यांनी स्पष्ट केले आहे.
सहकार्य करावे..
आमदार दीपक केसरकर यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे की, लवकरच हत्ती पकड मोहीम दोडामार्ग तालुक्यात राबविली जाणार असून त्यांना गुजरात जामनगर येथील वनतारा येथे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे हत्ती पकड मोहीम वरून काही लोकांनी जे राजकारण सुरू केले आहे ते त्यांनी तत्काळ थांबवावे. हत्ती कुठे न्यावा हा राज्य शासनाचा प्रश्न आहे आमचा नाही आम्हाला फक्त हत्ती पासून मुक्तता हवी. दोडामार्ग तालुका हंत्ती मुक्त झाला पाहिजे त्यामुळे सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी येथील शेतकरी कसा सुखी व सदन होईल याकडे लक्ष देऊन ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे गवस यांनी आवाहन केले.
अन्यथा तीव्र आंदोलन उभारणार
महाराष्ट्र सरकारने हत्ती प्रश्न गांभीर्याने घेऊन हत्ती पकड मोहीम राबवावी. पकड मोहीम ही कागदावरच राहता नये अन्यथा येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही श्री. गवस यांनी सांगितले.










