पक्षाच्या माध्यमातून लोकांकरिता काम करताना सामाजिक बांधिलकी जपा : सचिन वालावलकर

Edited by: दिपेश परब
Published on: January 05, 2024 18:02 PM
views 116  views

वेंगुर्ले : पक्षाच्या माध्यमातून सातत्याने लोकांकरिता काम करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं सक्षम नेतृत्वामुळे या मतदार संघात कोट्यावधींचा निधी आला आहे. मंत्री केसरकर यांच्या ताकद व पाठिंब्याच्या जोरावर आपण संघटना बळकट केली पाहिजे. त्यामुळे तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लोकांच्या मागे उभे राहून त्याची छोटी छोटी कामे करा. सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवा असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 'शिव संकल्प अभियान अंतर्गत  भव्य मिळावा ८ जानेवारी रोजी रत्नागिरी राजापूर होणार असून याबाबतच्या नियोजनासाठी वेंगुर्ला तालुका शिवसेनेची विशेष सभा आज ५ जानेवारी येथील सप्तसागर बिल्डिंग मधील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिन वालावलकर बोलत होते. 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सचिन वालावलकर यांचा वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, शहरप्रमुख उमेश येरम, जिल्हा संघटक सुनील डुबळे, तालुका संघटक बाळा दळवी, रेडीचे सुनील सातजी, युवासेना शहरप्रमुख संतोष परब यांच्यासाहित तालुका व शहर शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. 

यावेळी पुढे बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, भारतातील पहिला पाणबुडी प्रकल्प हा वेंगुर्ल्यातच होणार आहे. यासाठी गेली ४ वर्षे दीपक केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यासाठी विविध समित्याही नेमल्या आहेत. आणि याच मी साक्षीदार आहे. या प्रकल्पामुळे वेंगुर्ला तालुक्याच्या पर्यटनाला निश्चितच चालना मिळुन तालुक्याचा चेहरामोहरा बदलेल यात शंका नाही. 

यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी बोलताना म्हणाले की, संघटना आपल्या पाठीशी असेल तर कुठेही अडचण येणार नाही. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात जर विकास निधी मिळाला आहे त्यामुळे संघटना बळकटीसाठी सर्वांनी जोमाने काम करावे. तसेच ८ जाने रोजी राजापूर येथे होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यासाठी जाण्याबाबत तालुक्यातील नियोजनावर मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्याला बहुसंख्य कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले.