नारायण राणेंच्या वाढदिवस सोहळ्याला उपमुख्यमंत्री शिंदे राहणार उपस्थित

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 09, 2026 20:20 PM
views 38  views

कणकवली : कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

राणे आणि शिंदे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आणि सध्याच्या महायुतीमधील त्यांचे स्थान पाहता, हा सोहळा केवळ कौटुंबिक किंवा शुभेच्छांचा सोहळा न राहता त्याला मोठे राजकीय वलय प्राप्त झाले आहे. महायुतीमधील मजबूत समन्वय आणि परस्पर आदराचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.   

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून लाखो कार्यकर्ते आणि चाहते कणकवलीत दाखल होणार आहेत. हा कार्यक्रम एका मोठ्या राजकीय शक्तीप्रदर्शनाचे आणि कृतज्ञता सोहळ्याचे स्वरूप घेणार आहे. प्रशासनाकडून आणि आयोजकांकडून सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण कणकवली शहर सध्या पोस्टर, बॅनर्स आणि उत्साही वातावरणाने 'राणेमय' झाले आहे.