ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव

महाविकास आघाडीचं आंदोलन
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 09, 2025 17:40 PM
views 225  views

सिंधुदुर्गनगरी : आंबा काजू पिक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे..., रक्कम रखडणाऱ्या शासनाचा निषेध असो..., शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो... आदी घोषणा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम त्वरित मिळावी आणि महायुती सरकार तसेच भारतीय कृषी विमा कंपनीचे कान उघडण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे “ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव” आंदोलन छेडण्यात आले. यावेळी शासन, पालकमंत्री, कृषी विभाग आणि विमा कंपनी विरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. 

फळ-पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम न दिल्याने भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचे  पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषि अधीक्षक यांनी सांगितले होते. मात्र अद्यापही विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. गणेश चतुर्थी अगोदर फळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र विमा कंपनीने विम्याची रक्कम सोडाच विम्याचा डाटा देखील प्रसिद्ध केला नाही. जिल्हाधिकारी, कृषी अधिक्षक यांना आम्ही वारंवार निवदने देऊनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महायुती सरकार, राज्याचे कृषिमंत्री  आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे “ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव” आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी माजी आ वैभव नाईक, उद्धवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उद्धेवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) अनंत पिळणकर, बाबुराव धुरी, जयप्रकाश चमणकर, विजय प्रभू, नीलम पालव, माधवी दळवी यांच्यासह आंबा काजू उत्पादक बागायतदार शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना सतीश सावंत म्हणाले की, शासन आणि विमा कंपनीला जाग आणण्यासाठी शेतकरी बचाव कृषीमंत्री हटाव ढोल बजाव आंदोलन केले जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १४ कोटी रुपये आंबा काजू विम्या रक्कमेसाठी विमा कंपनीला दिले. त्यानुसार ३० जून पर्यंत शेतकऱ्यांना किती रक्कम देणार हे जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप ते जाहीर करण्यात आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी पालकमंत्री यांनी लावलेल्या बैठकांना विमा कंपनीचे अधिकारी आले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा आता विमा कंपन्यांवर विश्वास राहिला नाही. भारत कृषी विमा कंपनी काळया यादीत टाकणार असल्याचे सांगितले मात्र त्यावर कार्यवाही काही नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी रक्कम न दिल्यास विमा कंपनी प्रतिनिधी, अधिकारी, संचालक यांच्या  चामड्यान ढोल वाजवू असा इशारा यावेळी त्यांनी दिला. 

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी शेतकऱ्यांसोबत जो अन्याय केला जात त्याला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना काहितरी मिळावे यासाठी पीक विमा काढला जातो. मात्र तोही वेळेत दिला जात नाही याबाबत नाराजी व्यक्त केली.

माजी आ. वैभव नाईक यांनी  यावेळी बोलताना सांगितले की,  आंबा काजू पिक विमा रक्कम रखडविणाऱ्या महायुती सरकार आणि विमा कंपनी विरोधात महाविकास आघाडी मार्फत आंबा काजू उत्पादक बागायतदार शेतकऱ्यांसह ढोल बजाव कृषिमंत्री हटाव आंदोलन छेडले. विमा रक्कम मंजूर होऊन ६ महिने झाले तरी विम्याची रक्कम दिली जात नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी  वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. विमा कंपनीला  काळया यादीत टाकण्याच्या प्रस्ताव थांबविण्यात आला असल्याचे सांगण्यात अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या ओरोस येथील नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नसल्याचेही यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिले.