महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 20, 2025 19:42 PM
views 34  views

सिंधुदुर्गनगरी : राज्यात साजरा होणारा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केली. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तिन्ही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेत गणेशोत्सव मंडळांनी अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री अॕड. आशिष शेलार यांनी केले आहे.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०२५ असून, ही स्पर्धा विनामूल्य आहे. स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जाणार आहेत.  नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे या पोर्टल द्वारे प्रसिद्ध करावी. 

विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार प्रसार, आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायमस्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या विज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे.