
वेंगुर्ला : सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस सातत्याने समाजपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असते. गेल्या आठ वर्षांमध्ये सलग २४ रक्तदान शिबिरे रक्तदात्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यात आली. शनिवार दिनांक ०८ जून २०२४ रोजी रक्तदान शिबिरांची रौप्य महोत्सवी वाटचाल करताना २५ व्या महारक्तदान शिबिराचे आयोजन गोवा मेडिकल कॉलेज रक्तपेढीच्या सहकार्याने उत्सव मंगल कार्यालय तुळस येथे सकाळी ९.०० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.या महारक्तदान शिबिरासाठी सहयोगी संस्था म्हणून तुळस ग्रामपंचायत, तुळस जैतिराश्रीत संस्था मुंबई, सातेरी महिला मंडळ तुळस, चिंतामणी प्रतिष्ठान वेंगुर्ले, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक), कुंभारटेंब युवक कला क्रीडा मंडळ तुळस, झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल, गुरुकुल संगीत शिक्षण संस्था, न्हावेली, देसी बॉयज क्रिकेट संघ होडावडा आदीचे सहकार्य लाभणार आहे.
सदर महारक्तदान शिबिरामध्ये ज्या-ज्या रक्तदात्यांनी प्रतिष्ठान च्या मागील २४ रक्तदान शिबिरामध्ये अमूल्य रक्तदान करून सहकार्य केले अशा सुमारे ३०० रक्तदात्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येणार आहे. वेंगुर्ला तालुक्यामध्ये ज्या संस्था, मंडळे सातत्याने रक्तदान शिबिरे आयोजित करून आरोग्य क्षेत्रामध्ये मोलाची भूमिका बजावत आहेत अशा निवडक रक्तदान शिबिर आयोजक संस्थांचा ही विशेष सन्मान यावेळी केला जाणार आहे.
कृत्रिमरित्या रक्त तयार करता येत नाही त्यामुळे रक्तदान करून आपण कोणाचा तरी प्राण वाचवू शकतो, जीवन दाता बनू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावे आणि सन्मानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि सर्व सहयोगी संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे.