महाआवास अभियान : राज्यपातळीवर वाडोस व अणाव ग्रामपंचायती द्वितीय क्रमाकांच्या मानकरी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला सन्मान !
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 24, 2022 19:53 PM
views 361  views

कुडाळ : महाआवास अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्तीमध्ये कुडाळ तालुक्यातील वाडोस व अणाव ग्रामपंचायती या राज्यपातळीवर द्वितीय क्रमाकांच्या मानकरी ठरल्या आहेत. या ग्रामपंचायतीना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत अमृत महाआवास अभियान 2022- 23 च्या शानदार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात 20 नोव्हेंबर 2022 ते 31 मार्च 2023 कालावधीत अमृत महाआवास अभियान  2022- 23 राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, राज्य संचालक राजाराम दिघे इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर ऑडिटोरियम, मुंबई येथे पार पडला  या कार्यक्रमादरम्यान महाआवास अभियान 2020-21 मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या संस्था व व्यक्ती यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


महाआवास अभियान 2.0 मध्ये कुडाळ तालुक्याला जिल्हास्तरावर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व रमाई आवास योजनेअंतर्गत प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेले होते. विशेष म्हणजे या घरकुलांना रोजगार हमी, जलजीवन मिशन उज्वला योजना, महाऊर्जा अशा विविध योजनांचा लाभ देखील देण्यात आलेला आहे. तसेच या अभियानाचा भाग म्हणजे डेमो हाऊस बांधकाम करणे, कॉप शॉप सुरू करणे या सारखे लाभार्थीभीमुख उपक्रम प्राधान्याने पुर्ण करण्यात कुडाळ तालुका प्रथम क्रमांकावर आहे.


'या अभियाना अंतर्गत शासनास डेमो हाऊसमध्ये माहिती कक्ष किवां लाभार्थी/महिला स्वयंसहाय्यता गट यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी महिला स्वयंसहायता गट/ग्रामसंघ / प्रभाग संघ/विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था/ शेतकरी उत्पादन कंपनी ई. समुदाय आधारीत संस्थांच्या सहकार्यातून कॉप शॉप सुरू करणे अभिप्रेत आहे. त्याप्रमाणे कुडाळ पंचायत समितीने महाराष्ट्रातील पहीले डेमो हाऊस मध्ये कॉप शॉप सुरू केले आहे. या मध्ये कुडाळ तालुक्यातील महिला बचत गट यांना एकत्रित करून त्यांचेकडील उत्पादने सेंद्रिय खते, सेंद्रिय भाजीपाला, भाजीपाला रोपवाटीका विक्री केंद्र स्थापन करण्यात आले. केंद्र स्थापन करण्याचा उददेश तालुका अंतर्गत प्रभागातील महिला शेती व बिगर शेती आधारीत व्यवसाय करीता आहेत. त्यांच्या व्यवसायाच्या उत्पादनास गतिमान करण्याकरीता उपजीविका उपक्रमा अंतर्गत सेंद्रिय खते, सेदिय भाजीपाला, भाजीपाला रोपवाटीका तसेच सेंद्रिय उत्पादने विविध उत्पादने यांना बाजार पेठ मिळविण्याकरीता स्थापन करण्यात आले.

या अभियानामध्ये कुडाळ पंचायत समिती ने तालुक्यातील अनेक मागास वर्गिय वस्तीत गृहसंकुले बांधण्याचा उपक्रम हाती घेवुन तो पुर्ण केला. या मागास वर्गिय वस्तीत लाभार्थ्याना अनेक प्रकारच्या सार्वजनिक सोई सुविधा (रस्ते, गटारे, सार्व. विहीरी, ई.)पंचायत समिती कुडाळ मार्फत देण्यात आलेल्या आहेत. राज्यपातळीवरील पुरस्कारासाठी  राज्यस्तरीय अभियान अंमलबजावणी  नियंत्रण मूल्यमापन समितीने ही निवड केली आहे   हा पुरस्कार  पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण वाडोस सरपंच संजना म्हाडगुत  ग्रामविकास अधिकारी मयुरी बांदेकर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वैभव सावंत अणाव ग्रामपंचायत सरपंच नारायण मांजरेकर ग्रामसेवक सुनील वारंग यांनी स्वीकारला.