
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे आणि 'आयुष्यमान भारत'चे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या शुभहस्ते उद्या, २८ मार्च रोजी नेरूर येथे भव्य 'मोफत महाआरोग्य शिबिरा'चे उद्घाटन होणार आहे. नेरूर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र येथे सकाळी ९:३० वाजता हा सोहळा संपन्न होईल.
बेळगाव येथील प्रसिद्ध के. एल. ई. (KLE) हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर आणि स्टाफच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात सर्व प्रकारच्या रोगांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
या उद्घाटन समारंभाला कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे, बॅ. नाथ पै फाऊंडेशनच्या अध्यक्षा अदिती पै, जिल्हाधिकारी तृप्ती धोडपिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जि. प. सदस्य रुपेश पावसकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अनिल नेरूरकर, के. एल. ई. चे डॉ. माधव प्रभू आणि डॉ. अमल्लप्रभू कुडचे, मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, अजित शिरोडकर, राजश्री सामंत, मिलिंद नाईक, सीताराम तेली, दीप्ती नाईक, सरपंच भक्ती घाडीगावकर आणि उमेश गाळवणकर उपस्थित राहून शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेतील.










