मुख्य नळपाणी योजनेसंदर्भात माडखोल ग्रामस्थांचं उपोषण !

Edited by: विनायक गावस
Published on: October 11, 2023 16:44 PM
views 87  views

सिंधुदुर्ग : जलजीवन मिशन अंतर्गत माडखोल गावातील मुख्य नळपाणी योजना दुरुस्ती संदर्भात पावणेदोन कोटीचा सदोष प्रस्ताव तात्काळ रद्द करून नवीन परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचे आदेश द्यावेत. या मागणीसाठी मांडखोल ग्रामस्थांनी जिल्हा परिषद भवना समोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

 सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावातील मुख्य नळपाणी योजना दुरुस्ती संदर्भात जलजीवन मिशन अंतर्गत पावणे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु सदरचा प्रस्ताव सदोष असल्याने तो प्रस्ताव रद्द करुन नवीन प्रस्ताव पाठविण्यासंबंधीचा आदेश आपल्याकडून देण्यात यावा,या मागणीसाठी माडखोल ग्रामस्थ राजकुमार राऊळ, विजय राऊळ, वासुदेव होडावडेकर, स्वप्निल लातये, वसंत राऊळ,आदि ग्रामस्तानी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

या ग्रामस्थानी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माडखोल ग्रामपंचयतीने नळयोजनेचा  प्रस्ताव तयार करताना ग्रामसभेचा ठराव काही ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थांना पुर्णपणे अंधारात ठेवून तहकुब ग्रामसभेमध्ये मंजूर केला आहे.  मासिक सभेचा ठरावानंतर ग्रामसभेमध्ये लोकमान्यतेने त्या ठरावास मान्यता घ्यावी लागते. मात्र तसे न करता ग्रामपंचायतीने चुकीच्या पद्धतीने सदरचा प्रस्ताव पाठवलेला आहे.

जुन्या पाणी नसलेल्या विहीरीची खोदाई करुन, बक्षीसपत्र नसलेल्या जमिनीवर पाण्याची टाकी बांधलेली आहे. ती दुरुस्तीची शक्यता नाही. ग्रामसभेला विश्वासात न घेता पाणी नसलेल्या ठिकाणी बांधलेल्या पाण्याच्या टाकीतून ५००० लोकांपैकी केवळ १८५ लोकांनाच पाणी मिळणार असल्याचे निविदेचे अवलोकन केले लक्षात येते. त्यामुळे सदरची योजना ही फक्त कागदोपत्री असून मोदी सरकारच्या "हर घर जल" या योजनेला  ठेकेदाराकडून काळीमा फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

तरी माडखोल गावातील मुख्य नळपाणी योजना दुरुस्ती संदर्भात जलजीवन मिशन अंतर्गत आपल्या कार्यालयाकडे आलेला पावणे दोन कोटी रुपयांचा सदोष प्रस्ताव रद्द करुन नवीन प्रस्ताव पाठविण्यासंबंधीचा आदेश आपल्याकडून देण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी माडखोल ग्रामस्थानी आज पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.