एम. के. गावडे यांच्या साथीने जिल्ह्यात राष्ट्रवादी संघटना बळकट करणार : अबिद नाईक

Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2023 19:50 PM
views 114  views

वेंगुर्ले : शरद पवार आपले दैवत असले तरी अजित पवार यांनी सत्तेत गेल्याशिवाय जनतेची कामे होणार नाहीत ही भूमिका घेत निर्णय जाहीर केला या निर्णयाला आपण बांधील राहिलो.अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व आपल्या पाठीशी असल्याने लोकाभिमुख काम आपला राष्ट्रवादी पक्ष करेल असा विश्वास व्यक्त करत जेष्ठ नेते एम के गावडे यांच्या साथीने जिल्ह्यात संघटना भक्कम करणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबित नाईक यांनी वेंगुर्ला येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे राष्ट्रवादीची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अबिद नाईक बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते एम.के.गावडे, जिल्हा बँक माजी संचालक प्रज्ञा परब, प्रांतिक सदस्य सावळाराम अणावकर, माजी तालुकाध्यक्ष विलास गावकर, कणकवली शहर अध्यक्ष कणकवली इम्रान शेख, कुडाळ मालवण विधानसभा युवक अध्यक्ष सर्वेश पावसकर, माजी ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष दिलीप वरने, वेंगुर्ला माजी तालुकाध्यक्ष धर्माजी बागकर, सुभाष तांडेल, युवक अध्यक्ष सुरज परब, ऍड. प्रमोद धुरी, पेंडुर सामाजिक कार्यकर्ते नाना गावडे, माजी उपसरपंच प्रमोद शिरोडकर आदी उपस्थित होते. 

अबिद नाईक पुढे बोलताना म्हणाले, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी यांचे सरकार असून आपला पक्ष तिन्ही पक्षातील लोकांना सोबत घेऊन वाटचाल करणार आहे. राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता कितीही नाराज कार्यकर्ता असला तरी पुन्हा प्रवाहात आणणार. सहकार क्षेत्रातील जेष्ठ एम के गावडे व महिला काथ्या उद्योगासारखा प्रकल्प राबवून जिल्ह्यातील अनेक महिलांना रोजगार देणाऱ्या प्रज्ञा परब यांच्यासारखे अनुभवी व्यक्ती पाठीशी ठाम उभी आहेत. जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या काळात आठही तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष संघटना मजबूत करणार असून सर्वसामान्य लोकांना न्याय देता येईल यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी सोबत यावे व जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष बलशाली करावा.

तर कार्याध्यक्ष काका कुडाळकर बोलताना म्हणाले आपण राष्ट्रवादी मधून बाहेर पडलेलो नाहीत. संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी जी भूमिका घेऊन सत्तेत समाविष्ट झाले त्यांचे नेतृत्व मान्य करून अजित पवारांना विकासिभूक रस्त्यावर नेण्यासाठी अजित पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार. कुडाळ सावंतवाडी मतदार संघाची जबाबदारी आपण घेतली आहे.जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाशी जोडला जावा. राष्ट्रवादी पक्ष काही काळ मागे पडला होता त्यांना महायुतीच्या माध्यमातून बळ देण्याचे काम करणार असून पुढील आडवड्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जिल्ह्यातील प्रमूख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.