
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गावठी भाजी विक्री करणारी आंबेगाव येथील साई धाकू शेळके या महिलेची पैशाची पिशवी तिच्याकडून गहाळ झाली होती. समीर पडते, शंकर आडेलकर अन् सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्या महिलेला तीचे गहाळ झालेले पैसे परत मिळाले. आज सकाळी पोलिस ठाण्यात 14 हजार रक्कम असलेली तीची पिशवी सुपूर्त करण्यात आली. आडेलकर यांच्या प्रामाणिकपणाचेही कौतुक केले गेले.
ही महिला गेली ४० वर्ष सावंतवाडी शहरामध्ये गावठी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. या महिलेचे पती वयोरुद्ध असून तिचा 40 वर्षाचा मुलगा सतत पडतो. कुटुंबातील सदस्यांच आजारपण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ती भाजी घेऊन सावंतवाडी गाठते. यातच रविवारी तिची पैशाची पिशवी गहाळ झाली. येथील समीर पडते हे तिच्याकडे भाजी खरेदी करायला गेले असता ती रडताना दिसली. श्री. पडते यांना माझे पैसे कुठेतरी पडले, पिशवी हरवल्याचे तीन सांगितले. पडते यांनी तिला धीर दिला. दरम्यान, संध्याकाळी जिल्हा माहिती कार्यालय येथील शिपाई शंकर दत्ताराम आडेलकर यांची भेट पडते यांच्याशी झाली. तेव्हा आडेलकर यांनी पडते यांना आपल्याला पैशाची पिशवी मिळाली असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी भाजी विक्रेता महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु त्यांना ती कुठे सापडली नाही. आज सकाळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून त्या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली असतात ती आज सकाळी बाजारात दिसून आली. पैशाच्या पिशवीची ओळख पटली असता तिला पोलिस ठाण्यात घेऊन जात 14 हजार रुपयांची रक्कम असलेली पिशवी सुपूर्द केली. गहाळ झालेले पैसे मिळाल्याचे पाहून तीला गहिवरून आले. उपस्थितांचे तीने आभार मानले. याप्रसंगी पोलीस कर्मचारी दर्शन सावंत, पुंडलिक सावंत, तुकाराम जाधव, मयूर सावंत, शंकर आडेलकर, समीर पडते, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव आदी उपस्थित होते.