जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत लोरे नं 1 ग्रामपंचायत अव्वल !

लोरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 15, 2024 14:51 PM
views 99  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सन 2021 -22 सालचा जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार लोरे नं 1 ग्रामपंचायत ला जाहीर झाला आहे. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्काराचे वितरण उद्या शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथे होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली. 

सन 2019-20 ते सन 2021-22 मधील तीन वर्षांचे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.त्यात लोरे नं 1 ग्रामपंचायत ला सन 2021-22 सालचा स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. सरपंच अजय तुळशीदास रावराणे  यांनी हे यश आमदार नितेश राणे यांच्यासह ज्येष्ठ मार्गदर्शक तुळशीदास रावराणे, माजी पं स सभापती मनोज रावराणे यांचे मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक ऋतुराज कदम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, लोरे नं 1 गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी यांनी दिलेले अनमोल सहकार्य यांच्या सांघिक सहकार्याचे हे प्रतीक असल्याचे मनोगत व्यक्त केले. यापुढेही स्मार्ट ग्राम स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर लोरे नं 1 गाव आपल्या कार्याची मोहोर उमटवेल असा विश्वासही अजय रावराणे यांनी व्यक्त केला.

सन 2019 - 20 साठी कुडाळ तालुक्यातून पणदूर, देवगड मधून कुणकेश्वर, दोडामार्ग मधून तळकट व केर भोकुर्ली, कणकवली मधून ओटव, वेंगुर्लेतून कुशेवाडा, मालवण मधून हडी, वैभवाडीतून करूळ, सावंतवाडीतून कुडतरकर टेंम्ब ग्रामपंचायत ला स्मार्ट ग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. सन 2020-21 सालसाठी जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार कुडाळ मधून कुंदे, देवगड - वानिवडे, दोडामार्ग -कुडासे खुर्द, कणकवली - साकेडी, वेंगुर्ला कोचरा, मालवण - आंबेरी, वैभववाडी - उंबर्डे, सावंतवाडी- मळेगाव ग्रामपंचायत ना जाहीर झाला आहे. सन 2021 - 22 सालचा जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार कुडाळ - तुळसुली, नारूर, देवगड - दाभोळे, दोडामार्ग - झोळंबे, कणकवली - लोरे नं 1, वेंगुर्ले - परुळे बाजार, मालवण - गोळवन कुमामे, डिकवल, वैभववाडी - अरुळे, सावंतवाडी- निरवडे ग्रामपंचायत ला जाहीर झाला असून वरील सर्व पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या 16 फेब्रुवारी रोजी ओरोस येथे होणार आहे.