
रत्नागिरी : आजही अशा स्त्रिया आहेत की ज्यांच्या घरी त्यांचं अजिबात कौतुक होत नाही, पण तरीसुद्धा त्यांनी लढायचं थांबायचं नाहीये. कारण आपण जे करतोय ते कुठल्याही कौतुकासाठी नाही तर आपल्याच आनंदी आणि समृद्ध जगण्यासाठी आहे,. आजच्या सत्कारमूर्तींनाही आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी आल्या असतील. पण त्यांनी त्यावर मात करून वाटचाल केली. त्यामुळे आज त्या सन्मानाला पात्र ठरल्या आहेत. या सर्वांचा सन्मान करताना मला आज मी समृद्ध झाल्यासारखे वाटले, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री व कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी केले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिटयूटचे मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर झाले. यानिमित्त जयेश मंगल कार्यालयात वुमेन्स फेस्ट कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी इफको टोकियोच्या संचालक व मानव विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभू, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी, मणीलाल इन्स्टिट्यूटच्या संचालिका माधवी शिंदे, रत्नागिरी प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई व्यासपीठावर उपस्थित होते.
संपदा जोगळेकर-कुळकर्णी म्हणाल्या की, आज ज्या महिलांना पुरस्कार दिला गेला, तेव्हा आम्हालाही खूप आनंद होत होता. अशी देवाण-घेवाण जेव्हा समान पातळीवर होते तेव्हा त्याची मज्जा काही और असते. माझ्या सासुबाई हिंगणे येथील महर्षी कर्वे संस्थेत शिकलेल्या. त्यामुळे कडक शिस्तीच्या त्यामुळे आज मी कर्वे संस्थेची सून म्हणून कार्यक्रमाला आले. माझ्या आईने सांगितलं होतं तुला मी शिकवते, ज्याच्याशी तू लग्न करशील भविष्यामध्ये त्यांनी तुला पोसायचं नाहीये. तुम्ही दोघांनी मिळून संसार पुढे न्यायचा आहे. तेव्हा बावळटपणा आयुष्यात करायचा नाही. त्यामुळे शहरी वातावरण सोडून आम्ही फुणगूसला स्थायिक झालो तेव्हा माझ्या पदवी, सर्व शिक्षणाचा उपयोग शून्य झाला. परंतु मी नव्याने शिकत गेले. प्रतिकूल परिस्थिती मिळते तेव्हा झुंजले पाहिजे, बावळटपणा केला नाही. शेतीमध्ये मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळू लागल्या आणि शून्य पदावरून माझ्या आयुष्याची रंगत वाढली. कारण मला नवीन शिकावं लागलं.
घरातूनच समान न्यायाची सुरवात करा : उमा प्रभू
उमा प्रभू म्हणाल्या की, महर्षी कर्वे संस्थाचालकांनी आज समाजाच्या विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या महिलांची निवड केली आहे. हे बळ कुठून येतं. आपल्याला घरातूनही तेवढा चांगला पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. मी पत्रकार झाले, तेव्हा मला वडिलांनी कधीही भिऊ नकोस, असे सांगितले होते. १२७ वर्षांपूर्वी महर्षी कर्वेंनीही महिलांना अशा प्रकारे आकाशात भरारी मारायची संधी दिली. आजही समाजात महिला-पुरुषांना समान न्याय मिळत नाही. महिलेच्या नावावर स्वतःचे घर असले पाहिजे. तिचे पैसे तिला खर्च करण्याचा तिला हक्क नसतो. हे स्वातंत्र्य तिला मिळाले पाहिजे. फक्त घरासाठी महिला नोकरीतील प्रमोशन सोडतात. त्यामुळे फक्त महिला दिन साजरा करून हे स्वातंत्र्य मिळणार नाही तर त्यासाठी घरातूनच मुली-मुलांना समान न्यायाने वागवले पाहिजे व शिकवले पाहिजे. तुम्ही माणूस आहात, हे मनावर बिंबवले पाहिजे.
उपाध्यक्ष स्मिता कुलकर्णी म्हणाल्या की, ९० च्या दशकात संकट आल्यावरच महिला उद्योगात यायच्या. पण आज अनेक तरुण मुली वेगवेगळ्या कौशल्यांमुळे पुढे जात आहेत. महिला संकटाची चाहूल ओळखू लागल्या व स्वतःची ओळख बनवण्याचा प्रयत्न छोट्या उद्योजिका करत आहेत. म्हणून आज २८ उद्योजिकांचा कर्वे संस्थेतर्फे सत्कार केला.
दीपप्रज्वलन व आश्रम गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकामध्ये माधवी शिंदे यांनी कर्वे संस्थेची माहिती देऊन व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा फायदा रत्नागिरीकर महिला, तरुणींनी घ्यावा, असे आवाहन केले. जागामालक डॉ. गिरीश बिडिकर व डॉ. सौ. उमा बिडीकर यांचा आणि संस्थेच्या यशस्वी विद्यार्थिनी सिद्धी करंदीकर, प्रियांका तोसकर, सायली चिवटे, साक्षी ठाकूरदेसाई आणि तृप्ती साळवी यांचा सत्कार केला. उद्योगिनी महिलांचे निवडक स्टॉलचे प्रदर्शनाला प्रतिसाद मिळाला. सौ. अनघा मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक स्वप्नील सावंत यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान
उद्योजिका, शैक्षणिक, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या कर्तुत्ववान महिलांना सन्मानपत्र, पुष्परोपटे देऊन सन्मानित केले. यामध्ये राधिका फडके, डॉ. मीनल ओक, सीमा हेगशेट्ये, रसिका दळी, प्राची शिंदे, रुची राऊळ, कोमल तावडे, लक्ष्मी चौगुले, मनीषा रहाटे, रुपाली बेंद्रे, सौ. रेश्मा जोशी, डॉ. प्रिया यादव, डॉ. नेहा जोशी, विशाखा लेले, भक्ती किरपेकर, अक्षदा इंदुलकर, कविता शिंदे, शीतल सुपल, कल्याणी शिंदे, जान्हवी सप्रे- भडसावळे, सरिता पाष्टे, शुभा दळी, प्रज्ञा धांडोरे, निकिता कांबळे, अश्विनी पटवर्धन, रश्मी प्रभुदेसाई, स्नेहा बाणे, सोनल प्रभुळकर यांचा समावेश होता. या वेळी सत्कारमूर्ती डॉ. मीनल ओक, कोमल तावडे, आणि डॉ. नेहा जोशी यांनी महर्षी कर्वे संस्थेचे विशेष आभार मानून आज खऱ्या अर्थाने महिला शक्तीचा गौरव झाल्याचे सांगितले.