सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत निर्मितीला स्थानिकांचा विरोध

24 हरकती दाखल
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 31, 2025 20:17 PM
views 149  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी लवकरच घोषित करण्याचे जाहीर केलेली ओरोस बुद्रुक, रानबांबुळी व अणाव या तीन गावांची एकत्रित नगरपंचायत निर्मिती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. या तीन गावांचा समावेश करून 'सिंधुदुर्गनगरी' हे नवीन महसुली गाव स्थापन करण्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या प्रारूप अधिसूचनेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत.

२४ हरकती दाखल : गावांचा नगरपंचायतीला विरोध

  •   जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गनगरी या नवीन महसुली गावासाठी प्रारूप अधिसूचना जारी केली होती. यात ओरोस बुद्रुक (भूमापन क्र. २५४), रानबांबुळी (भूमापन क्र. १५६), अणाव (भूमापन क्र. २६५) आणि सिंधुदुर्ग नगरी (प्रस्तावित भूमापन क्र. ३) असे एकूण ६७८ भूमापन क्रमांक समाविष्ट केले होते.
  •  या अधिसूचनेवर हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२५ होती.
  •  या मुदतीत कुडाळ तहसीलदार कार्यालयात १० आणि उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, कुडाळ येथे १४ अशा एकूण २४ हरकतींची नोंद झाली आहे.
  •  महत्वाचे म्हणजे, या दाखल झालेल्या हरकतींमध्ये ओरोस, राणबांबुळी आणि अणाव या तिन्ही गावांनी नगरपंचायत निर्मितीला विरोध दर्शवला आहे.

नगरपंचायतीचे भवितव्य धोक्यात?

पालकमंत्र्यांनी नगरपंचायत लवकरात लवकर करण्याची घोषणा केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेमुळे स्थानिकांना नगरपंचायतीचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत होते. मात्र, तिन्ही गावांकडून आलेल्या या जोरदार विरोधामुळे आणि २४ हरकतींच्या नोंदीमुळे यापुढे नगरपंचायत निर्मितीचे काय होणार यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिकांचा विरोध लक्षात घेऊन प्रशासनाकडून आता पुढील कोणती पाऊले उचलली जातात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.