प्रार्थना स्थळावरील आवाजावर मर्यादा घालावी; मनसेची पोलीस प्रशासनाकडे मागणी !

लेखी निवेदनही केले सादर
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 11, 2023 19:01 PM
views 228  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील प्रार्थना स्थळावरील आवाजावर मर्यादा घालण्यात यावी, तसेच याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी निवेदनही सादर केले. याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असून प्रार्थना स्थळांच्या आवाजाची तीव्रता तपासली जाणार आहे , असे आश्वासन यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिले.

यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनवि सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, सुधीर राऊळ, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, मनवि सेना उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, माजी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, दर्शन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. सावंतवाडी शहरात तसेच तालुक्यात बहुतांशी प्रार्थनास्थळावर लावण्यात येणाऱ्या भोग्यांचे आवाज कर्कश आणि त्रासदायक असतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. मुंबई उच्च न्यायालयाने जास्त आवाज करणाऱ्या प्रार्थना स्थळावर कारवाईचे आदेश दिले असून आवाजाची मर्यादा देखील घालून दिली आहे. त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याचे आशिष सुभेदार यांनी सांगितले.

काही प्रार्थनास्थळे तर मर्यादेचे उल्लंघन करून मोठा आवाज सुरु ठेवतात, त्याचा परिणाम मुलाच्या शिक्षणावर देखील होत आहे, असे अॅड. अनिल केसरकर यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी आवाज तपासण्यासाठी लागणारी डेसिबल मशीन घ्यावी, मनसेचे कार्यकर्ते तुम्हाला आवाज किती आहे? कोणत्या ठिकाणी वाढवला जात आहे, हे दाखवतील असेही शिष्टमंडळाने सांगितले असता त्यावर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी याप्रश्नी प्रार्थनास्थळावरील प्रमुख असणार्‍या पदाधिकारी यांची बैठक घेऊन त्यांना तशा सूचना देण्यात येतील, तसे न झाल्यावर गुन्हेही दाखल केले जातील, असे आश्वासन देत सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील प्रार्थना स्थळाचे आवाज तपासण्याचे आदेश यावेळी मेंगडे यांनी दिले.

 निवेदनानुसार वाढीव आवाज तसेच कर्कश आवाज करणाऱ्या भोंग्यावर कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा मनसे आक्रमक भूमिका घेऊन हे आवाज कमी करणासाठी रस्त्यावर उतरणार, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळाने दिला.