'ताज'साठी केलेल्या भुसंपादनातील स्थानिकांच्या घरांबाबत सामोपचाराने निर्णय घेऊ : दीपक केसरकर

Edited by: दिपेश परब
Published on: September 24, 2023 19:59 PM
views 150  views

वेंगुर्ले : शिरोड्यात होणाऱ्या ताज प्रकल्पासाठी केलेल्या भुसंपादनातील स्थानिकांच्या घरांबाबत सामोपचाराने निर्णय घेऊ. ही जमीन मोजणीच्या वेळी कंपनी व पर्यटन विकास महामंडळ यांच्यासोबत चर्चा करून सर्व प्रश्न सोडवण्यात येतील. या प्रकल्पासाठी जी स्थानिकांची जागा सोडण्यात आली आहे ती पुन्हा घेतली जाणार नाही. स्थानिकांच्या घरांवर कोणतेही अनिष्ट येऊ देणार नाही.  मोजणीच्या वेळी कोणाची घरे, घरांचे कोपरे किंवा अन्य गोष्टी जात असतील तर तो भाग वागळण्याबाबत मोजणी करताना निर्णय घेण्यात येईल. एकंदरीत ताज प्रकल्पाच्या जागेची मोजणी करत असताना कोणत्याही कुटुंबावर अन्याय केला जाणार नाही असे लेखी सुद्धा एमटीडीसी मार्फत देण्यात येणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा येथे व्यक्त केला. 

    शिरोडा वेळागरवाडी येथील ताज प्रकल्पाच्या पर्यटन क्षेत्रातून ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची मागणी स्थानिक शेतकरी व नागरिकांनी केली होती. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी २३ ऑगस्ट रोजी येथील लिंगेश्वर मंदिर येथे या सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला होता व पुन्हा याबाबत सविस्तर बैठक घेऊन सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आज (२४ सप्टेंबर) मंत्री दीपक केसरकर यांनी शिरोडा वेळागरवाडी येथे स्थानिकांना भेट देत ताज प्रकल्पासाठी भुसंपादित केलेल्या जागेची पाहणी केली तसेच यात जी देवस्थानची ठिकाणे, मंदिरे, स्थानिकांची घरे, घरांचा काही भाग जात आहेत त्यांची पाहणी केली. 

  यावेळी स्थानिकांनी सांगितले की, आमचा पर्यटनास विरोध नसून शिरोडा वेळागरवाडी येथील सर्व्हे नंबर १, ७,  २९, ३० पैकी काही भाग, सर्व्हे नंबर ३२ संपूर्ण भाग वगळण्याच्या दृष्टीने अद्यापही स्थानिकाना न्याय मिळाला नाही. या क्षेत्रात अत्यंत दुर्बल शेतकरी असून याठिकाणी शेती करून उदरनिर्वाह करत होतो. तसेच याठिकाणी माड बागायती सुद्धा होत्या. मात्र शासनाने ही जमीन संपादित केल्यानंतर या जमिनीची मशागत न झाल्याने दुरवस्था झाली आहे. तर १९९४ पासून असणारी आमची मागणी पूर्ण करून सदरचे क्षेत्र वगळून पर्यटक करावे अशी मागणी केली. 

    या बाबत मंत्री दीपक केसरकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला तर मोजणीच्या वेळी या जमिनीतील जी घरे किंवा घरांचा काही भाग, मंदिर जात आहेत ते त्यावेळी कंपनी व एमटीडीसीशी चर्चा करून वगळण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार ओंकार ओतारी, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, शिरोडा ग्रामपंचायत माजी सदस्य कौशिक परब, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पडवळ यांच्यासाहित भूमी अभिलेख चे अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     ताज हॉटेल प्रकल्प भूसंपादनचा प्रश्न यापूर्वीच सुटलेला आहे. या प्रकल्पासाठी जमिनी गेलेल्या जमीन मालकांना अधिकची भरपाई देण्याचे निश्चित झाले आहे. हा प्रकल्प याठिकाणी सुरू झाल्यानंतर याठिकाणच्या प्रत्येक घरातील एक युवकाला रोजगार देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्या आधी त्यांना ट्रेंनिगसाठी पाठवण्यात येणार आहे. महिला बचत गटांच्या हाताला रोजगार मिळवून दिला जाईल तसेच छोट्या छोट्या हॉटेल साठी सुद्धा सबसिडी दिली जाणार आहे. या भागात समृद्धी आणण्याच्या आपला प्रयत्न असल्याचेही यावेळी दीपक केसरकर म्हणाले.