आगामी शिक्षक भरतीतून मागासवर्गीयांचा अनुशेष दूर करू!, शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचे आश्वासन

कोल्हापूर येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे पहिले राज्य अधिवेशन संपन्न
Edited by: रुपेश पाटील
Published on: December 05, 2022 15:44 PM
views 223  views

सावंतवाडी : राज्यात लवकरच शिक्षकांची भरती करून भरतीमधील मागासवर्गीयांचा अनुशेष दूर केला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोल्हापूर येथील कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्यामध्ये दिले. तसेच राज्यातील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे ही शिक्षकांमधूनच ५०% भरती केली जाईल, असे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे, यासाठी त्यांनी आग्रहाची भूमिका मांडली.

कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या पहिल्या राज्य अधिवेशनासाठी उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा अभिमान वाटतोय,  कारण ही शाहू महाराजांची पवित्र नगरी आहे, असे सांगत त्यांनी राजर्षी  शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त शाहू महाराजांच्या विचारांचे आणि कार्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी त्यांनाही अभिवादन केले.

पुरोगामी महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. महाराष्ट्र हे शिक्षणाच्या बाबतीमध्ये एक नंबरचे राज्य करण्याचा मनोदय यावेळी शिक्षण मंत्री  केसरकर यांनी व्यक्त केला. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे यांनी यावेळी शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांना  गौतम बुद्धांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच मंत्री केसरकर यांच्या मागील ३० वर्षेपासून केलेल्या काही सामाजिक कार्याची आठवणी सांगितल्या.

 सिंधुदुर्ग जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते, सुरेश प्रभू यांसारख्या बुद्धीवंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. या परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम हे दीपकभाई करत आहेत. राज्याला एक उत्कृष्ट शालेय शिक्षण मंत्री मिळाला त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आम्ही धन्यवाद देतो. पुढील काळामध्ये शालेय शिक्षण मंत्री म्हणून केसरकर हे आपला ठसा राज्यामध्ये उमठवतील आणि देशांमध्ये महाराष्ट्र हे शिक्षणामध्ये एक नंबरचे राज्य होईल, यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेकडून सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आकाश तांबे यांनी दिले.

  रवींद्र पालवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या  अधिवेशनामध्ये राज्यातील २५ गुणवंत शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री यांच्याहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये गिरीश फोंडे (राज्य समन्वयक, शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती) आणि महावीर माने (सेवानिवृत्त शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य)  यांनी सहभाग घेतला.  विभागीय उपसंचालक महेश चोथे यावेळी उपस्थित होते.

सदर अधिवेशनामध्ये  छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऐतिहासिक माणगाव परिषदेचे महत्त्व बाबुराव कांबळे यांनी आपल्या व्याख्यानामधून सांगितले. स्वागताध्यक्ष नामदेवराव कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेअभिनेते निलेश पवार यांनी केले.  कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गौतम वर्धन यांनी उपस्थितांचे आभार मानले. या अधिवेशनाला राज्यभरातून जवळपास ५००० शिक्षक बांधव उपस्थित होते.