
वेंगुर्ला : ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या मतदार संघात मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भरगोस विकासात्मक कामे झाली आहेत. यामुळे आता महायुतीच्या माध्यमातून दीपक केसरकर यांच्या प्रचाराची यंत्रणा योग्य पद्धतीने राबवणे गरजेचे आहे. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जुने काही गैरसमज हेवेदावे असतील तर ते बाजूला ठेऊन आपल्याला एकत्र राहून महायुतीची सत्ता येण्यासाठी काम केलं पाहिजे. आजची या समन्वय बैठकीची उपस्थिती चांगली आहे. यामुळे पुढील २० दिवसात योग्य प्रचाराची यंत्रणा राबवूया असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ला तालुका महायुतीची समन्वय बैठक सप्तसागर अपार्टमेंट येथील शिवसेना कार्यालयाच्या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डूबळे, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुहास कोळसूलकर, शहरप्रमुख उमेश येरम, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, शिवसेना तालुका संघटक दिशा शेटकर, उपजिल्हा संघटक शीतल साळगावकर, मनवेल फर्नांडिस, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख कौशिक परब, सलील नाबर यांच्यासाहित प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसन्ना देसाई म्हणाले की, ४ तारीख नंतर आपले महायुतीचे कोण प्रतिस्पर्धी रिंगणात असतील हे स्पष्ट होणार आहे. यानंतर महायुतीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निहाय बैठका, खळा बैठका याचे नियोजन करण्यात येईल. भाजप म्ह्णून तालुक्याची कोअर कमिटी करणार आहोत. त्या त्या जिल्हा परिषद गटात महायुतीची संयुक्त कमिटी भेट देणार आहे. लोकसभेतील यंत्रणा राबवली तशीच यंत्रणा यावेळी राबवायची असल्याचेही त्यांनी संगितले.
मतभेद दूर करता येतात पण मनभेद दूर करता येत नाहीत त्यामुळे कोणीही कोणतेही मनभेद न ठेवता आपले महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्यासाठी एकजुटीने काम करूया असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले. वेंगुर्ला तालुक्यात महायुतीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांमध्ये वाद नाहीत कारण आम्ही सर्व विविध पक्षात असलो तरी एकमेकांचे मित्र आहोत. यामुळे महायुतीला वेंगुर्ला तालुक्यात चांगले वातावरण आहे असल्याचे सुनील डुबळे यांनी सांगितले.
राजन तेलींच्या विरोधाभासला बळी पडू नका - दिलीप गिरप
आजची बैठक हा प्रचाराचा शुभारंभ अस समजूया. भाजपचे पदाधिकारी हे आपल्यासोबतच आहेत असा विरोधाभास राजन तेली यांच्याकडून ठिकठिकाणी केला जात आहे. त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला महायुतीचा उमेदवार हे दीपक केसरकरच आहेत. कोणीही राजन तेली याना मदत करता कामा नये. राजन तेली ठाकरे शिवसेनेचे आहेत. आपल्याला राज्यात सेना -भाजपची- राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीची सत्ता आणायची आहे त्यामुळे आजपासून कामाला लागा. आम्ही सर्व वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे महायुतीचेच काम करणार आहोत. असे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी सांगितले.
९ रोजी दीपक केसरकर यांचा वेंगुर्ला दौरा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर हे ९ नोव्हेंबर रोजी जिल्हापरिषद मतदार संघ निहाय दौरा करणार असून सकाळी ९.३० वाजता म्हापण, ११ वाजता आडेली, १२.३० वाजता तुळस, ३ वाजता रेडी व ५.३० वाजता उभादांडा व संध्याकाळी ७ वाजता वेंगुर्ला शहर असा दौरा असणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्यापासून जिल्हापरिषद निहाय कशा बैठका घ्यायच्या यावर चर्चा करून नियोजन करण्यात येणार असल्याचे सचिन वालावलकर यांनी सांगितले.