
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ हे २०२७ पर्यंतचे महत्वाचे लक्ष्य ठेवून १७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२५ या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान (LCDC) राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील निदान न झालेल्या नवीन रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ उपचाराखाली आणणे आणि समाजात जागृती वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
जिल्हास्तरीय नियोजनाची तयारी पूर्ण
या अभियानाच्या नियोजनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सतीश गुजलवार, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश करतस्कर आदी अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण + जोखीमग्रस्त शहरी भागात घराघरात सर्वेक्षण हे अभियान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०० टक्के ग्रामीण क्षेत्रात तसेच शहरी भागातील जोखीमग्रस्त लोकसंख्येमध्ये राबवले जाणार आहे. प्रत्येक पथकात दोन सदस्य – आशा स्वयंसेविका आणि पुरुष स्वयंसेवक – अशी जोडी तयार करण्यात आली आहे. पथक १४ दिवसांच्या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याची तपासणी करणार. महिलांची तपासणी आशा स्वयंसेविका तर पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करतील.
तपासणीची मुख्य लक्षणे
कुष्ठरोगाची सुरुवातीची लक्षणे साधी असल्याने घराघरात खालील बाबी तपासल्या जाणार आहेत:
त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टे
त्या चट्ट्यावर घाम न येणे
त्वचा जाड, तेलकट किंवा चमकदार होणे
त्वचेवर गाठी, कानाच्या पाळ्या जाड होणे
डोळे पूर्णपणे बंद न होणे, भुवया विरळ होणे
हात-पायांमध्ये मुंग्या येणे/बधीरपणा
हातातून वस्तू पडणे, चप्पल गळणे, चालताना पाय लुळा पडणे
संशयित रुग्णांसाठी त्वरित वैद्यकीय तपासणी
तपासणीदरम्यान कोणतीही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीची ‘संशयित कुष्ठरुग्ण’ म्हणून नोंद होईल.
अशा सर्व रुग्णांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याच दिवशी किंवा ७ दिवसांच्या आत करण्यात येईल.
निदान निश्चित झाल्यास, रुग्णाला मोफत बहुविध औषधोपचार (MDT) तात्काळ सुरू केला जाईल.
जिल्हावासियांना सहकार्याचे आवाहन
आरोग्य विभागाने सांगितले की, कुष्ठरोग पूर्णपणे बरा होणारा आजार असून लवकर निदान केल्यास विकृती टाळता येते.“१७ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करा. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून घ्या आणि ‘कुष्ठरोगमुक्त सिंधुदुर्ग’ अभियानात सहभागी व्हा,” असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.










