
खेड : खेड तालुक्यातील ऐनवरे गाव व परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षभरात बिबट्याने सहा शेतकऱ्यांच्या तब्बल दहा दुभत्या जनावरांचा फडशा पाडला आहे.
तिसंगी मोहल्ला, मोहाने, ऐनवली, कुळवंडी, तांबरीची वाडी, गुणदे अशा सात-आठ गावांमध्ये बिबट्याचा सक्रिय वावर आहे. जंगलाच्या कुशीत वसलेल्या या गावांमध्ये सकाळ, दुपार आणि संध्याकाळ कोणत्याही वेळी बिबट्या आढळतो. कधी शेतात, तर कधी बंद वाड्यांमध्ये घुसून दुभत्या जनावरांवर हल्ले करतो.
२९ जुलै रोजी ऐनवरे गावातील पोलिस पाटील शिवाजी पोफळकर यांच्या बंद वाड्यात बिबट्याने शिरून सहा महिन्यांचे दूध पिणारे वासरू उचलून नेले. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. विशेष म्हणजे बिबट्या दिवसाढवळ्या रस्त्यांवर व वाड्यांतून फिरताना दिसतो, हे आणखी चिंतेचे कारण आहे.
या एक वर्षात शेतकरी विश्वास पोफळकर यांचे वासरू, अनंत लाड्या हळदे यांचा बैल, सुभाष गणपत जाधव यांच्या दोन दुभत्या गायी, सतीष गणपत हळदे यांची गाय, अंकुश अर्जुन हळदे यांच्या दोन गायी आणि सुभाष रामचंद्र जाधव यांचे वासरू अशा अनेक शेतकऱ्यांचे जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.
या प्रकारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ सतत दहशतीत जीवन जगत आहेत. या पार्श्वभूमीवर ऐनवरे येथील श्री. दिनेश पोफळकर यांनी वनविभागाने तातडीने लक्ष घालून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांचा संयम सुटण्याची शक्यता आहे.