मांगवलीतील तरुणावर बिबट्याचा हल्ला

तरुण गंभीर जखमी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 04, 2025 12:38 PM
views 1769  views

वैभववाडी : मांगवली आयरेवाडी येथील विजय अशोक आयरे (२७)या विवाहीत तरुणावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना बुधवारी रात्री ९.३०च्या दरम्यान मांगवली आयरेवाडी येथील पुलानजीक घडली. या हल्ल्यात विजय हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय यांचं मांगवली आयरेवाडी येथे घर आहे. काल सायंकाळी त्यांची गुरे घरी आली नसल्याने ती पाहण्यासाठी विजय व त्याचा पुतण्या गंधार दुचाकीने वेंगसरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान आयरेवाडी पुलानजीक विजय हा लघुशंकेसाठी थांबला. तो त्याकरिता नदी पात्रात उतरला असता, झुडपात असलेल्या बिबट्याने मागून त्याच्यावर जोरदार हल्ला केला. बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत विजय याच्या डोक्यावर व डाव्या पायावर जखम झाली. पुतण्या व विजय यांनी आरडाओरडा केल्यावर बिबट्या तेथून पळाला. त्यानंतर पुतण्या गंधार याने दुचाकीवरून विजय याला उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर वनविभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनेचा पंचनामा सुरू आहे.या प्रकारानंतर पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.