
सावंतवाडी : आरोस दांडेली येथील येथील सचिन धावू शेळके यांच्या मालकीच्या बकऱ्यावंर बिबट्याने हल्ला चढविला. यात बकरा मृत झाला. मात्र बाजूलाच असलेली दुसरी बकरी त्याने नेली.
आज पहाटे चारच्या सुमारास शेळके कुटुंबाला बकऱ्या ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे लागलीच घरातील व्यक्ती बाहेर येऊन बघतात तर एक बकरा रक्ताच्या थारोळ्यात होता तर बाजूच्या बकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत त्याला घेऊन गेला. यामुळे येथील शेळके कुटुंब धास्तावले असून ,वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे त्यांचे बरेच नुकसान होत आहे.
मागील महिन्यात येथील शेतकऱ्यांच्या बकऱ्यांवर असाच हल्ला चढविला होता. यावेळी घरातील माणसांची चाहूल लागताच ही बकरी जखमी अवस्थेत टाकून पसार झाला होता. या घटनेची माहिती शेळके कुटुंबाने वनविभागाला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असून, संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी जात त्यांनी घटनेचा पंचनामा केला.
मात्र या कुटुंबात लहान लहान मुले असून या बिबट्याच्या सतत होणाऱ्या प्राण्याच्या हल्ल्यामुळे हे कुटुंब भीतीच्या छायेत आहे. वारंवार या हल्ल्याच्या घटना घडत असून वनविभागाने ठोस अशी या बिबट्यांबाबत कारवाई करावी अशी मागणी शेळके कुटुंब व ग्रामस्थ करत आहेत.










