
कणकवली : प्रकाशन क्षेत्रातील कोकणातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सुप्रसिद्ध लेखिका डॉ. योगिता राजकर यांच्या मंतरधून या ललित लेख संग्रहावर आणि बाईपण या दीर्घ कवितासंग्रहावर ८ मार्च रोजी वाई येथे सायं. ५ वा. लोकमान्य टिळक वाचनालयच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजित करण्यात आले आहे. वाई साहित्य मित्र मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेला हा परिसंवाद सुप्रसिद्ध कवी तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यात वक्ते म्हणून सुप्रसिद्ध समीक्षक डॉ.दत्ता घोलप,नामवंत कवी तथा स्तंभ लेखक अजय कांडर आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. पंडित टापरे आदी आपले विचार व्यक्त करणार आहेत.
कणकवलीत प्रभा प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथांची आता मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण अशी दखल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. योगिता राजकर लिखित ग्रंथांवर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून, विजय चोरमारे, दत्ता घोलप, अजय कांडर आणि पंडित टापरे हे मराठी साहित्यातील नामवंत अभ्यासक या दोन्ही ग्रंथांवर स्वतंत्रपणे मांडणी करणार आहेत. त्याचबरोबर यावेळी मंतरधून, बाईपण या दोन्ही ग्रंथांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. मंतरधून या ललित ग्रंथाला सुप्रसिद्ध समीक्षक तथा शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांची प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात, निसर्गाबरोबर संवादी होऊन केलेली निरीक्षणे आणि त्यावरील लेखनाचीही मोठी समृद्ध परंपरा आहे. या परंपरेतच योगिता राजकर यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण लेखन समाविष्ठ करता येईल.हे पुस्तक म्हणजे निसर्गाशी तादात्म्य पावल्यानंतर ऐकू येणारी ' मंतरधून ' आहे.
निसर्गाची स्पंदने टिपणारी लेखिकेची नजर अतिशय सूक्ष्म आहे.या लेखांमध्ये निसर्गाशी संवादी असलेल्या संत तुकारामांचा दाखला देऊन निसर्ग आणि माणसाच्या सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.तर बाईपण या काव्यसंग्रहाची ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे यांनी पाठराखण केली असून त्यात त्या म्हणतात,"बाईपण" हे दीर्घकाव्य म्हणजे समग्र बाईपणाच्या जगण्याला भिडणं आहे. स्त्रीचं कांडून घेणं, जळत राहणं, वेदनेतही संसार सुखी कसा करायचा ते ती शिकवत आली आपल्याला.'वाहे डोळ्यातून पाणी /करी मोकळे मनास/नदीपाशी बोलुनिया/ बाई राखते जीवास ! 'वेदनेचा हा कल्लोळ सदर चार ओळीत अतिशय टोकदार पद्धतीने कवयित्री मांडते. स्त्रीविषयीची अनितीमान संस्कृती या काव्यातून प्रतिबिंबीत होते.सर्जनक्षमतेच्या साम्य स्थळांवर माती लोटून ,ती माती कपाळाला लावणाऱ्या ढोंगी संस्कृतीचे वाभाडे काढणारी डाॅ.योगिता यांची ही कविता आहे.'बाईपण' आणि तिच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न केवळ स्री मनाभोवती कोरलेले नसून एकूणच स्री यातनेचा धांडोळा घेणाऱ्या, गुंता सोडविणाऱ्या मनस्विनीचे ते काव्यरुपी मनोगत मराठी काव्यात नक्कीच वेगळे मर्म सांगणारे आहे. कवयित्रीची शब्दकळा अल्प शब्दात मोठ्ठा आशय सांगणारी किमयाच आहे.स्री मुक्त्तीचा मार्ग सांगत सांगत स्रीवादी समीक्षेला एक प्रकारचे हे आव्हानच दिलेले आहे. तरी या परिसंवादात साहित्य रसिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वाई साहित्य मित्र मंडळातर्फे करण्यात आले आहे.