
सावंतवाडी : रस्ता अपघात प्रतिबंध आणि सुरक्षित वाहनचालना या उद्देशाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आज २५ सप्टेंबर रोजी राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले. हा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यामध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक मितेश माने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन, वाहन चालविताना आवश्यक खबरदारी, वाहतूक शिस्तीचे महत्त्व तसेच जबाबदार नागरिक म्हणून घ्यावयाची भूमिका याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी परिवहन विभागाचे कर्मचारी लहू वाळके देखील उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










