LIVE UPDATES

लक्ष्मण कदम यांचा वर्दे ग्रामस्थांतर्फे सत्कार

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 23, 2026 15:26 PM
views 12  views

सावंतवाडी : अपघातग्रस्त, गोरगरीब रुग्ण, गंभीर जखमी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी धाऊन जाणारे  सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम यांचा त्यांच्या सक्रीय योगदानाबद्दल वर्दे या त्यांच्या मूळ गावी ग्रामस्थांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला.

अनाथ, निराधार, अपघातग्रस्त, गंभीर जखमी, गरजू, गोरगरीब रुग्णांसाठी श्री. कदम प्रत्यक्ष अपघात स्थळी धाऊन जातात. स्वतः पुढाकार घेऊन मदत आणि बचाव कार्य करतात. गंभीर अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करुन प्रसंगी त्यांचे प्राण वाचवतात. रुग्णवाहिकेची सेवा देतात. या त्यांच्या कार्यामुळे कित्येकांना जीवदान मिळते.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान मार्फत सुरु असलेले त्यांचे हे कार्य तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरत असल्याने वर्दे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा हा सत्कार करण्यात आला. सरपंच महादेव पालव, उपसरपंच रुपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ झाला. यावेळी  ग्रामस्थ रवींद्र सावंत, सत्यवान कदम, एकनाथ सावंत, स्वामी सावंत आदी उपस्थित होते.

सरपंच पालव यांनी समाजऋण फेडण्याचे हे कदम यांचे व्रत असेच अखंड सुरू राहो, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. कदम म्हणाले, माझ्या मूळ गावच्या ग्रामस्थांनी पांघरलेली प्रेमाची शाल आणि व्यक्त केलेला विश्वास स्मरणात राहिल. ग्रामस्थांच्या या प्रेमा खातर सदैव ऋणी राहिन.