
सिंधुदुर्गनगरी : शिक्षण घेण्यासाठी वय किती झाले हे महत्वाचे नसते.महत्वाची असते ती शिकण्याची इश्चा आणि वृत्ती. जी व्यक्ती नेहमी शिक्षणाची वृत्ती ठेवून मेहनत घेते, तिच व्यक्ती आयुष्यात नवनवीन यश संपादन करीत असते. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात न्याय विभागाच्या अधीक्षक पदावरून सुमारे ३७ वर्षे सेवा बजावून नोव्हेंबर २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या एन पी मठकर यांनीही वयाच्या ६० व्या वर्षी अशीच किमया केली आहे. त्यांनी ५६.२६ टक्के गुण मिळवून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यामुळे ज्या न्यायालयात न्यायाधीशांनी केलेले न्याय लिहिण्याचे काम केले त्याच न्यायालयात आता मठकर वकील म्हणून न्यायाधीश यांच्यासमोर उभे राहून कायद्याने बाजू मांडणार आहेत.
या जगात सर्वात हुशार म्हणून संबोधला जाणार मनुष्य प्राणी हा नेहमीच एक वेगळ्या चर्चेत राहिलेला आहे. आपल्या हुशारीने कोणी कमी वयात पूर्ण जगाला लाजवेल, असे यश मिळवतो. तर प्रचंड चिकाटी दाखवून वृद्ध झाला तर यश संपादन करतो. अभ्यास करण्यासाठी वय लागत नाही. वय झाले म्हणून अभ्यास थांबविणे चुकीचे आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील नामदेव फटु मठकर या ६० वर्षाच्या व्यक्तीने प्रचंड जिज्ञासा बाळगून वकील होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मठकर यांनी १ मार्च १९८६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या आस्थापनेवरील सावंतवाडी मुख्य न्याय दंडाधिकारी येथे कनिष्ठ लिपिक म्हणून आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला.
त्यानंतर ते सहाय्यक अधीक्षक प्रशासन, न्याय अधीक्षक या पदापर्यंत पोहोचले. ही ३६ वर्षे ९ महिन्यांची सेवा करून ते वयाच्या ५८ व्या वर्षी ३१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. ही सेवा बजावत असताना कणकवली न्यायालयात सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी कायद्याच्या परीक्षेस बसण्याची रीतसर परवानगी तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांच्याकडे मागितली होती. त्यांनी त्याची परवानगी दिली होती. २०१९ मध्ये मठकर यांनी कुडाळ येथील व्हिक्टर डांटस लॉ कॉलेजात आपल्या वकिलीचा अभ्यास सुरू केला. मुंबई विद्यापीठाने २४ जुलै २०२४ रोजी जाहीर केलेल्या निकालात ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी बी प्लस म्हणजेच ५६.२६ टक्के गुण मिळविले आहेत.
मठकर यांचे हे वयाच्या ६० व्या वर्षातील यश होतकरू तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. एखादे यश संपादन केल्यावर समाधान मानून घरात बसणाऱ्यांच्या काळजात धस करणारे आहे. मठकर हे सेवानिवृत्त अधीक्षक आहेत. त्यांना शासनाची पेन्शन आहे. ते समाधानाने घरात बसून जीवन जगू शकले असते. परंतु त्यांना कायद्याची पदवी मिळवायची होती. ज्या न्यायालयात झालेले निकाल लिहिण्याचे काम केले त्याच न्यायालयात वकील म्हणून बाजू मांडण्याची प्रबळ इच्छा होती. ती इच्छा त्यांना झोपू देत नव्हती. त्यामुळेच त्यांनी हे यश संपादन केले आहे. जिल्ह्याच्या इतिहासात न्यायालयात सेवा पूर्ण करून त्याच न्यायालयात वकील म्हणून जाणारे ते पहिले ठरले आहेत. महाराष्ट्रात असे यश प्रथमच मिळविले गेले आहे, असे मठकर सांगतात.