
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे वार्षिक स्नेहसंमेलन 'युवारंभ २०२५' मोठ्या उत्साहात सुरू झाले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.
याप्रसंगी भोसले नॉलेज सिटीच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, बी.फार्मसी प्राचार्य डॉ.विजय जगताप, वायबीआयटी प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि उपप्राचार्य गजानन भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.रमण बाणे यांनी सर्वांचे स्वागत केले आणि कॉलेज शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर कलांनाही महत्त्व देते असे सांगितले. वायबीआयटीचे विद्यार्थी क्रीडा आणि कलाक्षेत्रात नेहमी आघाडीवर असल्याचेही ते म्हणाले. उपप्राचार्य गजानन भोसले यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल वाचून दाखवला. सचिव संजीव देसाई यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटीजसुद्धा व्यक्तीमत्व विकासासाठी महत्वाच्या असल्याचे सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे परितोष कंकाळ यांनी कॉलेजच्या प्रगतीचे कौतुक करताना म्हटले की, वायबीआयटी हे कोकणातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मी स्वतः एक इंजिनिअर असून सर्वांगीण विकासाचे महत्व जाणतो. तुम्ही सुद्धा करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ऑलराऊंड डेव्हलपमेंटवर भर द्या. फक्त, नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता प्रशासकीय अधिकारी होण्याचा प्रयत्न करा.वायबीआयटीचे वातावरण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. चालू शैक्षणिक वर्षासाठी मुलींची जनरल चॅम्पियनशिप कॉम्प्युटर विभागाच्या विद्यार्थिनींनी तर मुलांची जनरल चॅम्पियनशिप मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिंकली. बीकेसी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'बीकेसी प्रीमियर लीग २०२५' स्पर्धेच्या विजेत्या संघानाही पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत 'सिंहगड सुप्रीमोज' हा संघ विजेता ठरला, तर 'शिवनेरी फायटर्स' संघ उपविजेता ठरला. सर्वोत्तम गोलंदाज (बेस्ट बॉलर)चा पुरस्कार धनंजय गावडे यांना, तर सर्वोत्तम फलंदाज (बेस्ट बॅट्समन)चा पुरस्कार भूषण सावंत यांना देण्यात आला. याशिवाय, 'मॅन ऑफ द सीरीज'चा पुरस्कार सिद्धेश घाडगावकर आणि श्रीधर मयेकर यांना संयुक्तपणे देण्यात आला.
दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात सोलो डान्स, ग्रुप डान्स, गायन, एकांकिका, शिमगोत्सव आणि दशावतारी नाटक यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. आकर्षक रंगमंच, लाइटिंग आणि साउंड सिस्टममुळे कार्यक्रम रंगतदार झाला. सूत्रसंचालन अमर प्रभू, संचिता कोल्हापुरे आणि विद्यार्थी प्रतिनिधी अथर्वा परब, उर्वी आंदुर्लेकर, विधी कोटणीस यांनी केले. आभार प्रदर्शन अंकिता माईणकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात सादरकर्त्यांना दाद दिली. काल वायबीआयटीच्या डिप्लोमा विभागाचे कार्यक्रम संपन्न झाले. आज पदवी विभागाचे कार्यक्रम होतील.