स्व. अरविंद दिक्षितांमुळे शिक्षकांचे हात लिहिते झाले : डॉ. जी. ए. बुवा

Edited by:
Published on: April 21, 2025 15:34 PM
views 157  views

सावंतवाडी : स्व. अरविंद दिक्षित हे कर्तव्य दक्ष अधिकारी होते. त्यांनी शिक्षकांना प्रेरणा देण्याचे खरे कार्य  केल्यामुळेच शिक्षकांचे हात लिहिते झाले. याचे उदाहरण म्हणजे प्रा अविनाश बापट यांच्या हातून साहित्य सेवा घडली आहे. प्रा बापट यांनी एकूण ३५ पुस्तके लिहिली असुन कथा, कादंबरी, ललित लेख, व्यक्तिचित्र, बालकथा, कवितासंग्रह आदी साहित्यातील सर्व  प्रकाराचे लिखाण त्यांनी हाताळलेले आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक डॉ. जी. ए. बुवा यांनी केले. 

चिंतामणी साहित्य प्रकाशन सहयोग संस्था आणि साटम महाराज वाचन मंदिर या दोन संस्थांच्यावतीने दाणोली हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रा. अविनाश बापट यांच्या 'कातळ शिल्प आणि ता मालवणी चेडू' या दोन मालवणी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ जी. ए. बुवा बोलत होते. यावेळी व्यासपिठावर दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जयंत पाटील, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अध्यक्ष भरत गावडे, शंकर प्रभू, संतोष पवार, श्री राठोड, माजी सैनिक सहदेव राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुलांनी सादर केलेले स्वागत पद्य लक्षवेधी ठरले तर शंकर प्रभू यांनी कविता सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. कातळ शिल्प आणि ता मालवणी चेडू' या दोन मालवणी पुस्तकाचे प्रकाशन डॉ जी. ए. बुवा आणि भरत गावडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राध्यापक अविनाश बापट यांनी मी विज्ञान शाखेचा प्राध्यापक पण मालवणी भाषेची गोडी असल्याने मी लिहीत गेलो आणि वाचक वाचत गेले. यातूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि आज समर्थ साटम महाराजांच्या पुण्यभूमीत माझ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. याचा मला आनंद होत असल्याचे सांगितले.

यावेळी वाचनालयाच्यावतीने दाणोली हायस्कूलचे मुख्याध्यापक जयंत पाटील यांचा लेखक तथा प्राध्यापक अविनाश बापट आणि कवी संतोष पवार यांच्याहस्ते शाल श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. तसेच देवसू हायस्कूलमधील एन एम एस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या श्वेता रामचंद्र देऊसकर  तसेच नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झालेली दिव्या भगवान वरक या दोन विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सौ संगीता सोनटक्के यांनी वाचनालयाला समई तर प्राध्यापक अभिनय बापट यांनी दोन ग्रंथ प्रदान केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात भरत गावडे यांनी स्व अरविंद दीक्षित यांच्या दुसऱ्या स्मृती दिनाच्या औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगुन त्यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक जयवंत पाटील, सुत्रसंचालन सिमा पंडित यांनी तर आभार शिक्षक टिळवे यांनी मानले.