वेंगुर्ले गवळीवाडा जमीन मालकी हक्क प्रश्न सुटणार !

मंत्री केसरकरांच्या माध्यमातून सचिन वालावलकर यांच्या प्रयत्नांना यश
Edited by: दिपेश परब
Published on: February 15, 2024 10:30 AM
views 260  views

वेंगुर्ले : शहातील कॅम्प परिसरातील गवळीवाडा येथील ब्रिटीश काळापासून वस्ती करून असलेल्या गवळी समाज बांधवांना त्यांच्या घर व गोठ्याखालील जमिनीचे मालकी हक्क मिळण्याच्या दृष्टीने मंगळवारी महसूल मंत्र्यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य सचिन वालावलकर यांनी स्थानिक आमदार व राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आपल्या विशेष पाठपुराव्याने हे यश असल्याची भावना गवळीवाडा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

वेंगुर्ले - कॅम्प परिसरात ब्रिटीश काळापासून आपले अस्तित्व टिकवून असलेल्या गवळीवाडा येथील गवळी समाजाच्या लोकांची वडिलोपार्जित घरे, गोठे आहेत. परंतु या घराखालची, गोठ्याखालची व घराच्या आजूबाजूची वापरात असलेली जमीन ही त्यांच्या नावावर नसून ती सरकारच्या नावे आहे. ही जमीन आपल्या नावे व्हावी, अशी मागणी गेली कित्येक वर्षे या वाडीतील ग्रामस्थ करीत आले आहेत. परंतु, हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक व नियोजन मंडळ समन्वयक सचिन वालावलकर यांनी या प्रश्नी लक्ष घालून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याची फलश्रुती म्हणून मंत्रालयातील महसूल मंत्र्यांच्या दालनात या प्रश्नाच्या निराकरणासाठी महसूल मंत्र्यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले.

या बैठकीस महसूलमंत्री तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याचे महसूल सचिव, कोकण आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, वेंगुर्ले तहसीलदार, भूमिलेख अधिकारी, नियोजन मंडळ सदस्य सचिन वालावलकर व गवळीवाडा ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत केसरकर यांच्या विशेष आग्रहास्तव महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या गवळीवाडा परिसरातील ग्रामस्थांच्या घर व गोठ्याखालील जमीन सदर घरमालकांच्या नावावर करणे व घरासभोतालची वापरातील जमीन जुन्या रेडीरेकनर दरानुसार त्या-त्या घरमालकांच्या नावावर करण्याबाबतचा प्रस्ताव करून तो तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेश महसूल सचिवांना दिले.

हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आल्यानंतर त्यास निश्चितपणे मान्यता देऊ, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी केसरकर, सचिन वालावलकर व गवळीवाडीतील ग्रामस्थांना दिली. त्यामुळे आता गवळीवाडीतील जमिनीचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार असल्याची खात्री या ग्रामस्थांना झाली आहे. आजच्या या यशस्वी बैठकीबद्दल गवळीवाडा ग्रामस्थांनी महसूल मंत्र्यांबरोबरच दीपक केसरकर व सचिन वालावलकर यांचे आभार मानले आहेत.