सर्वच पक्षांत लँडमाफीयावाले...!

सासोलीत परप्रांतीयांना आणण्यास जिल्ह्यातीलच लोक : परशुराम उपरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: September 20, 2024 10:58 AM
views 319  views

सावंतवाडी : सर्वच पक्षांमध्ये लँडमाफियावाले आहेत. जिल्ह्यातीलच लोकांनी या जिल्ह्यामध्ये परप्रांतीय आणले.  सासोलीमध्ये ही परप्रांतीयांना आणण्यास जिल्ह्यातीलच लोक जबाबदार आहेत.  कुठल्या पक्षात लँडमाफियावाले नाही हे दाखवून द्या, असे आव्हान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिले.  

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार हे निष्क्रिय आमदार ठरले आहेत. तीन वेळा त्यांनी जनतेची फसवणूक केली.  तीन वेळा त्यांनी वेगळे पक्ष बदलून आपला स्वार्थ साधला. पण या मतदारसंघासाठी आणि येथील नागरिकांसाठी त्याचा काही फायदा झाला नाही. आज दिपक केसरकर हे राज्यांचे शिक्षण मंत्री असून जिल्ह्यात शिक्षकांची भरती त्यांना करता आली नाही. चष्म्याचा कारखाना उभारता आला नाही.  आता ते जर्मनीत नोकरी लावण्याची आश्वासने तरुणांना देत आहेत. या मतदारसंघातील सर्व मतदार केसरकर यांच्यावर नाराज आहेत, असे उपरकर यावेळी म्हणाले. राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा किती उंचीचा असावा याबाबत शासनाने समिती गठीत केली आहे. मात्र, केसरकर हे या ठिकाणी शंभर फूट शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचे सांगून शिवसृष्टी वसविण्याचे आश्वासन देत आहेत. यासाठी तुमच्याकडे जमीन आहे काय? जमीन आहे त्या जागा मालकांना याबाबत कोणती कल्पना नाही. शिवसृष्टीचे आश्वासन हे सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल प्रमाणेच आहे. ते कधीच होणे  शक्य नाही. अशी टीका उपरकर यांनी केसरकर यांच्यावर केली. 

 दरम्यान, जिल्ह्यात लँडमाफियांचा सुळसुळाट झाला असून जिल्ह्यातील जागा परप्रांतीयांच्या घशात घातल्या जात आहेत.  जिल्हात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. आंबोली येथील घाटामध्ये  कित्येक खून प्रकरणे घडली आहेत मात्र याचे सुखदुःख या मतदारसंघाचे आमदार म्हणून केसरकर यांना अजिबात नाही. ते डोळ्याला पट्टी बांधून आहेत. असा आरोप उपरकर यांनी केला.