
मंडणगड : उमेद अभियान सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बचत गटांना दिशा मिळाली. उमेदच्या माध्यमातून हळूहळू महिला व्यवसायामध्ये उतरायला लागल्या आहेत. ग्रामविकास खात्याअंतर्गत येत असलेल्या उमेद च्या माध्यमातून महाराष्ट्रात वेगळी क्रांती घडवण्याचा आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी केले. यावेळी लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेखही केला.
शिवसेनेच्या वतीने आयोजित मंडणगड मधील देव्हारे येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मंत्री असलो तरी माझे मतदार संघातील लक्ष पूर्वीपेक्षा अधिक राहणार आहे, मतदार संघात सामन्य ते सामान्यांना भेडसावणाऱ्या शासकीय विभागातील समस्या सोडवण्यासाठी आगामी काळात मंडणगड तहसील कार्यालयाच्या समोर आपले जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुले केले जाईल. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मंडणगड मधील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यात येतील. याचबरोबर मतदार संघात यापुढे वार्षिक आढावा बैठक न घेता दर सहा महिन्यांनी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मतदार संघाला विकासाच्या प्रवाहात नेण्यासाठी आपली आग्रही भूमिका असल्याचे सांगत मंडणगड मध्ये मोठ्या एमआयडीसी निर्मितीसाठी शासकीय स्थरावरील काम प्रगतीपथावर असल्याचे व आगामी काळात लवकरच त्यास मुहूर्तस्वरूप येणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष आदेश केणे, शहरप्रमुख नगरसेवक विनोद जाधव, विभागप्रमुख संजय शेडगे, माजी जि. प. सदस्या अस्मिता केंद्रे, माजी सभापती अमिता शिंदे, विभागप्रमुख दीपक मालुसरे, इरफान बुरोंडकर, सिद्धेश देशपांडे, युवसेनेचे उपाध्यक्ष प्रतिक पोतनीस यांच्यासह मोठ्या संख्यने कार्यकर्ते, शासकीय विभागातील अधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.