वैद्यकीय सुविधांचा अभाव, तरूणांच रक्त सळसळल !

घेतली आक्रमक भूमिका
Edited by:
Published on: December 08, 2024 20:06 PM
views 332  views

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखवून लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येऊन सरकार, लोकप्रतिनिधी व प्रशासनावर दबाव गट निर्माण करण्याचा निर्णय मळगाव भूतनाथ मंदिरमध्ये झालेल्या बैठकीत घेतला. दरम्यान येत्या २६ जानेवारी रोजी जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत डॉक्टरसह सुमारे ८०० कर्मचारी वर्ग कमी असल्याने जनता आरोग्यसेवेअभावी त्रस्त असल्याचे समोर आले आहे. सिंधुदुर्ग सावंतवाडी वैद्यकीय यंत्रणा नावाने एक गृप निर्माण झाला आहे. अपघातात वैद्यकीय सेवेअभावी हकनाक बळी पडणाऱ्या तरुणांची वाढती संख्या लक्षात घेऊन तरुणांनी एकत्र येऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे गाजर दाखविले जात आहेत यावर संताप व्यक्त करण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक रुग्णालय मध्ये सुमारे ८०० पेक्षा जास्त कर्मचारी, डॉक्टरांची प्रतिक्षा आहे. मात्र, ती भरून जनतेला सेवा दिली जात नाही म्हणून नाराजी व्यक्त करण्यात आली.यावेळी झालेल्या चर्चेत अँड संदीप निंबाळकर, अभिमन्यू लोंढे,काका सावंत, भूषण मांजरेकर, वासुदेव भोगले, सुधीर राऊळ, आनंद माळकर, संजय लाड यांच्यासहित उपस्थितांनी आरोग्य सेवा, वैद्यकीय साधने, डॉक्टर, कर्मचारी, शासकीय विमा योजना, रक्तदान, अपुरे कर्मचारी, ढिम्म प्रशासन आदी विषयांवर संताप व्यक्त करणारी चर्चा केली. उठसूठ बांबोळी गोवा रूग्णालयात रूग्णांना रेफर करण्याचे प्रकार आणि अपघातातील रुग्णांना वेळेवर सेवा मिळत नसल्याने जीव गमावले जात आहेत. त्यामुळे यापुढे सरकार आणि प्रशासनावर दबाव गट निर्माण करत आरोग्य सेवा, रक्तदान, आरोग्य शिबीर, रुग्णांच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे असे चर्चेत ठरले. यावेळी संघटन करण्यासाठी भूषण मांजरेकर (रेडी), वासुदेव भोगले (बांदा), आनंद माळकर (तुळस), सुधीर राऊळ (मळगाव), अजित पोळजी ( तळवणे), अक्षय पार्सेकर ( न्हावेली), संजय लाड (माडखोल), निखिल पार्सेकर (आरोंदा), सुरज पालयेकर (दांडेली), अनिल जाधव (निगुडे), विनय गावडे (निरवडे), राकेश शेट्ये (पेंडुर), आनंद वरक (केसरी), परशुराम लांबर (केसरी), सिध्देश आजगावकर ( मळगाव), केतनकुमार गावडे ( पेंडुर), ओंकार परब आदिंच्या उपस्थित आरोग्य सेवा संघटनेची स्थापना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू व्हावे आणि अपुरे ८०० पेक्षा जास्त डॉक्टर व कर्मचारी भरती प्रक्रिया करण्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी संदीप नेमळेकर, निखिल माळकर, सचिन पांगम, समीर पार्सेकर ,गजानन सातार्डेकर, प्रसाद गावडे, ओंकार मोरजकर यांच्यासह असंख्य तरुणांनी बैठकीत सहभाग दर्शवला होता.