वायंगणीत आजपासून श्रमसंस्कार शिबिर

आचरा महाविद्यालयाचा उपक्रम : राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आयोजन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: January 09, 2024 18:55 PM
views 71  views

मालवण : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आचरा मॅनेजमेंट स्टडीज आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास' शिबीराचा वायंगणी देऊळवाडी (ता. मालवण) येथे मंगळवार ९ जानेवारीपासून प्रारंभ झाला. या शिबीराची १५ जानेवारी रोजी सांगता होणार आहे. 

९ रोजी सायंकाळी ४ वाजता वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आचरा महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय मिराशी हे अध्यक्षस्थान भूषवतील. प्रमुख पाहुणे म्हणून आचरा महाविद्यालयाचे खजिनदार विद्यानंद परब, सदस्य जे. एम. फर्नांडिस, आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक गोपाळ परब, इंग्रजी माध्यमच्या मुख्याध्यापिका एम. एस. फर्नांडिस, महाविद्यालयाचे प्राचार्य जी. टी. दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे, नेतृत्व गुणाना संधी देणे, श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे, सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करणे, जलसंवर्धन व पर्यावरण याबद्दल जाणीव निर्माण करणे, ग्रामीण जीवनाच्या समस्या व उपाययोजनांबद्दल चर्चा करणे, बालसंस्कार, आरोग्य यांचा प्रसार करणे आदी उद्दिष्ट्ये या शिबिराच्या केंद्रस्थानी आहेत. 

ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडुजी, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण, युवा पालक मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक वारसा व दुर्लक्षित पर्यटन आदी प्रकल्पकार्ये शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहेत. १० रोजी युवकांचे आरोग्य या विषयावर डॉ. स्वरा भोगटे, ११ रोजी अंधश्रद्धा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टिकोन यावर प्रा. विजय चौकेकर, १२ रोजी युवकांसमोरील आव्हाने यावर प्राचार्य जी. टी. दळवी, १३ रोजी युवकांचे राष्ट्रीय सेवेतील महत्व यावर महाविद्यालय समन्वयक विशाल गुरव तर १४ रोजी वासिम सय्यद हे राष्ट्रीय सेवा योजनेेतून कौशल्य विकास यावर मार्गदर्शन करणार आहेत.