
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कुपवडे बौद्धवाडी येथील ग्रामस्थांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नावर आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, येत्या २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'लॉन्ग मार्च' काढण्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या वस्तीला रस्ता नसल्याने पावसाळ्यात ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात. रस्ताअभावी रुग्णवाहिका किंवा साधी चारचाकी गाडीही वाडीत येऊ शकत नाही, ज्यामुळे रुग्णांना दवाखान्यात नेणे जिकिरीचे ठरते. माजी तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या कार्यकाळात या प्रश्नावर गटविकास अधिकारी आणि पंचायत समिती प्रशासनासोबत बैठका झाल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी शून्य राहिली, अशी खंत अंकुश कदम (सचिव, दि बुद्धिस्ट फेडरेशन सिंधुदुर्ग) यांनी व्यक्त केली.
रस्त्याचा मार्ग पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती (कोल्हापूर) च्या जमिनीतून जातो. या संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला होता. देवस्थान समितीकडून मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर पूर्वीचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही प्रशासन यावर कोणतीही हालचाल करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
२६ जानेवारीला आंदोलनाचे हत्यार
प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध म्हणून कुपवडे बौद्धवाडीच्या ग्रामस्थांनी खालील निर्णय घेतले आहेत:
निवडणूक बहिष्कार: रस्ता मिळेपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान न करणे. लॉन्ग मार्च: २६ जानेवारी रोजी राष्ट्रध्वजाला अभिवादन केल्यानंतर, उपविभागीय कुडाळ कार्यालयापासून जिल्हाधिकारी ओरोस कार्यालयापर्यंत पायी 'लॉन्ग मार्च' काढणे.
विविध संघटनांचा पाठिंबा
या आंदोलनाला 'दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग' ने जाहीर पाठिंबा दिला आहे. मराठा समाज हॉल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला पर्णवी जाधव (उपाध्यक्ष), अभय पावसकर, महेश पेडणेकर (सत्यशोधक कार्यकर्ता) यांच्यासह सुनील तांबे, कविता जाधव, चांगदेव तांबे, सखाराम तांबे, विठ्ठल कदम, विकास तांबे यांसारखे अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










