
देवगड : हर हर महादेवाच्या जयघोषात, ओम नमः शिवायच्या नामजपात व श्री देव कुणकेश्वरच्या नामघोषात श्रीक्षेत्र कुणकेश्व तीर्थस्थानी दुसऱ्याही दिवशी शिवभक्तांचा जनसागर लोटला होता.पहिल्याच दिवशी भाविकांच्या गर्दीन उच्चांक गाठला होता.तसेच रविवारी अमावस्येची पर्वणी असून, यादिवशी पवित्र तीर्थस्नानाने यात्रेची सांगता होणार आहे.
अनेक मान्यवर मंडळी तसेच राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी दर्शन घेतले. तसेच दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्यावतीने लोकप्रतिनिधी, महनीय व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, सरपंच महेश ताम्हणकर, एकनाथ तेली आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
यात्रेमध्ये रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची मिठाई, हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, चायना खेळणी यांनी यात्रा परिसर फुलून गेला होता. यात्रेच्या ठिकाणी पारंपरिक शेती अवजारे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली होती.
कुणकेश्वरच्या समुद्र किनारीही भेल, आईस्क्रिम, इतर हॉटेल्स यामुळे समुद्र किनारा दुकानाने भरून गेलेला दिसून येत होता. चायना वस्तू ते हस्तकला, धार्मिक व सामाजिक संस्थांची माहिती देणारी केंद्रे यातून यात्रा सजली होती. गृहोपयोगी वस्तू, कलिंगड बाजार यांनी संपूर्ण कुणकेश्वर सजले होते. मंदिर परिसर व यात्रेमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कुणकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व सेवा मंडळ यांनी खास रांगांची- व्यवस्था करण्यात आली होती.
देवगड पंचायत समितीमार्फत विविध योजनांची माहिती देण्यासाठी मंदिरासमोर विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन व तहसील नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला होता. तालुका विधी सेवा समितीमार्फत जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आला होता.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटधारक पोलिस व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कर्मचारी सतर्कतेने काम करत होते. ग्रामस्थांचे भरारी पथक समुद्रस्नान करणाऱ्या भाविकांवर लक्ष देऊन आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिस प्रयत्न करीत होते. यात्रेतील अनुचित प्रकारावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे टेहळणी पथक देखील सतर्क आहे.
एस्.टी. प्रशासनामार्फत भाविक प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मार्गावर एस्टी गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिस बंदोबस्त व वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. दुचाकी व तीनचाकी, चारचाकी गाड्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था दरवर्षीप्रमाणे ठेवण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळपासून समुद्र किनाऱ्यावर भाविकांच्या गर्दीचा उच्चांक दिसून येत होता. समुद्र किनाऱ्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महिला पोलिस तसेच पोलिस अधिकारी तैनात ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रत्येक स्वयंसेवकही कार्यरत होते. यात्रा यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत कुणकेश्वर व देवस्थान ट्रस्ट व कुणकेश्वर ग्रामस्थांनी नेटके नियोजन केले होते.